काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला. यानंतर दहशतवाद्यांविरोधात देशभरातून तीव्र निषेध करण्यात आला. अनेक कलाकारांनीही सोशल मीडियामार्फत पोस्ट करीत त्यांच्या भावना व्यक्त केल्या; तर हल्ला झाल्यानंतर सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले. पाकिस्तानचे सोशल मीडिया अकाउंट भारतात बॅन करण्यात आले, तर काही दिवसांपूर्वीच काश्मीरमध्ये हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानी कलाकार सहभागी असलेल्या कलाकृतींवर बंदी आणली.
यासह काही दिवसांनंतर आता पाकिस्तानी कलाकारांचेही सोशल मीडिया अकाउंट भारतात बॅन केले आहेत. गेल्या काही दिवसांत पाकिस्तानी अभिनेता फवाद खान मुख्य भूमिकेत असलेल्या ‘अबीर गुलाल’ या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती. हा चित्रपट ९ मे रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु, काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या चित्रपटाला बॅन करण्यात आलं आहे.
यामध्ये फवाद खानसह अभिनेत्री वाणी कपूरही मुख्य भूमिकेत होती. पण, चित्रपटाला बॅन करण्यात आल्याने आता वाणी कपूरने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ‘अबीर गुलाल’ चित्रपटाच्या संदर्भातील सर्व फोटो व्हिडीओ डिलीट केले आहेत.
‘अबीर गुलाल’ चित्रपटातून फवाद खान तब्बल नऊ वर्षांनी बॉलीवूडमध्ये पुनरागमन करणार होता; तर शेवटचा तो ‘ए दिल है मुश्कील’ या चित्रपटात झळकला होता. फवाद खान व वाणी कपूर यांच्यासह या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल,रिद्धी डोगरा, सोनी राझदान यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते.
या चित्रपटासह काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर हानिया अमीर, अली जफर, इम्रान अब्बास, आतिफ अस्लम, फावद खान यांसह इतर पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मीडिया अकाउंटही भारतात बॅन करण्यात आले आहेत.
दरम्यान, नुकतेच बॉलीवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांनीदेखील याबाबत भाष्य केलं आहे. सध्या मुंबईमध्ये ‘जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेन्मेंट सुमित २०२५’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान, सेलिब्रिटी, राजकीय नेते यांसह अनेक प्रसिद्ध लोकांनी हजेरी लावली. याच कार्यक्रमाला जॅकी श्रॉफदेखील उपस्थित होते.
यादरम्यान त्यांना पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मीडिया अकाउंट भारतात बॅन झाल्याबद्दल विचारण्यात आलं. यावर त्यांनी, “मला सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल काही बोलून कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण करायचा नाही, पण आताची परिस्थिती बघता त्यांचा निर्णय योग्य आहे. थोडं अंतर ठेवलेलं आपल्या भल्याचं आहे आणि जोवर पंतप्रधान काही बोलत नाही, तोपर्यंत आपण सगळे काय बोलणार,” असं म्हटलं आहे.