Vidya Balan Talks About Chhaava Fame Actor : विद्या बालन ही बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने ‘परिणीता’ या २००५ साली आलेल्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर तिने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. विद्याला अभिनयाचा कोणताही वारसा नसताना तिने तिच्या कलेच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.

विद्याने एकाच पठडीतल्या भूमिकांमध्ये न रमता वैविध्यपूर्ण भूमिकांना पसंती दिली, त्यामुळे तिने निवडलेल्या भूमिका व चित्रपट यासाठी चाहत्यांनी नेहमी तिचं कौतुक केलं. आपल्या खंबीर भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी विद्या खऱ्या आयुष्यात मात्र एक वेगळाच संघर्ष करत होती. अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, इंडस्ट्रीत नवीन असताना ती स्वत:च्या निर्णयांवर शंका घेत असे आणि तिला कोणालाही नाही म्हणणं कठीण जायचं.

विद्या बालनने ‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत सांगितलं आहे. ती म्हणाली, करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिला एखाद्या चित्रपटाला नाही म्हणणं जमायचं नाही. यादरम्यान तिने ‘छावा’ फेम अभिनेता अक्षय खन्नाबरोबरच्या चित्रपटाचा एक किस्सा सांगितला आहे. विद्या या मुलाखतीमध्ये म्हणाली, “मला आता ही गोष्ट खूप सोपी वाटते, पण २० वर्षांपूर्वी मला भीती वाटायची. मला आजही आठवतं की, अक्षय खन्नाची मुख्य भूमिका असलेल्या एका चित्रपटासाठी मला विचारणा झाली होती”.

अभिनेत्री याबाबत पुढे म्हणाली, “काही कारणांमुळे मला ती कथा आवडली नव्हती. पण, मी स्वत: फोन करून दिग्दर्शकाला असं सांगू शकत नव्हते, म्हणून मी माझ्या मॅनेजरला फोन करून याबाबत बोलायला सांगितलं. पण हे इथेच संपलं नाही. नंतर जेव्हा आम्ही ‘सलाम ए इश्क’च्या सेटवर भेटलो, तेव्हा अक्षय खन्ना मी घाबरेन या हेतूने माझी मस्करी करत म्हणाला, तुला चित्रपटात काम करायचं नव्हतं हे तू मला का नाही सांगितलंस. पण, तेव्हा मी खरंच इतकी घाबरले होते की मी जॉन अब्राहमकडे मदत मागितली होती.”