बॉलीवूडमधील ‘डॉन’ सिनेमा आणि त्याचा रिमेक आणि पुढे याच सिनेमाचे आलेले भाग लोकप्रिय आहेत. १९७८ साली अमिताभ बच्चन यांचा आलेल्या डॉनचा फरहान अख्तरने २००७ मध्ये रिमेक केला. यात शाहरुख खानने मुख्य भूमिका केली होती. याच सिनेमाचा ‘डॉन २’ हा दुसरा भाग आला. यात शाहरुख खानची एन्ट्री, डायलॉग्स यामुळे प्रेक्षकांनी या सिनेमाला डोक्यावर घेतले होते. या सिनेमाच्या तिसर्‍या पार्टची घोषणा झाल्यावर मात्र यात शाहरुख दिसणार नसल्याने कोणता अभिनेता ही भूमिका करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. रणवीर सिंह या सिनेमात डॉनची भूमिका साकारणार अशी घोषणा चित्रपटांच्या निर्मात्यांनी केली. आता या सिनेमात खलनायकाची भूमिका कोण साकारणार या चर्चा सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छोट्या पडद्यावरून करिअरची सुरूवात करणारा प्रसिद्ध अभिनेता ‘डॉन ३’ मध्ये खलनायकाची भूमिका साकारणार आहे. बॉलीवूडमध्ये सर्वोत्तम अभिनेत्यांच्या यादीत आता नाव सामील झाले आहे. या अभिनेत्याने ’12th फेल’ आणि ‘डेथ ऑफ द गंज’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची चुणूक दाखवली आहे. या अभिनेत्याचे नाव आहे विक्रांत मॅसी.

ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘सेक्टर ३६’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारल्यानंतर विक्रांत मॅसी आता मोठ्या पडद्यावरही खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. रिपोर्टनुसार, विक्रांत फरहान अख्तरच्या बहुचर्चित चित्रपट ‘डॉन ३’ मध्ये खलनायकाची भूमिका साकारणार आहे. आतापर्यंत या चित्रपटाच्या निर्मात्यांनी रणवीर सिंग आणि कियारा अडवाणी यांच्या नावांचीच अधिकृत घोषणा केली आहे.

‘डॉन ३’मध्ये रणवीरच्या समोर विक्रांत मॅसी!

‘झूम टीव्ही’च्या वृत्तानुसार, ‘डॉन ३’ मध्ये रणवीर सिंग आणि विक्रांत मॅसी आमनेसामने दिसणार आहेत. विक्रांत चित्रपटात मुख्य खलनायकाची भूमिका साकारणार आहे, लवकरच निर्माते याची घोषणा करू शकतात. सोशल मीडियावर चाहत्यांनी ’12th फेल’ या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेल्या विक्रांतची ‘डॉन’ फ्रँचायजीत एन्ट्री झाल्याने जोरदार स्वागत केले आहे.

विशेष म्हणजे, याआधी रणवीर आणि विक्रांतने ‘लूटेरा’ आणि ‘दिल धडकने दो’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. मात्र, या दोन्ही चित्रपटांमध्ये विक्रांतने सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिका साकारल्या होत्या. मात्र आता तो रणवीरसमोर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. फरहान अख्तरच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या ‘डॉन ३’ मध्ये रणवीर सिंगबरोबर कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

विक्रांत मॅसी शेवटचा ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटात दिसला होता. त्याआधी त्याने ‘सेक्टर ३६’ या ओटीटी चित्रपटात दमदार अभिनय साकारला होता. त्याच्या ’12th फेल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. हा चित्रपट एका सत्यघटनेवर आधारित होता, ज्यात विक्रांतने बिहारच्या एका मुलाची भूमिका साकारली होती. सर्व अडचणींवर मात करून हा मुलगा अखेर IPS अधिकारी कसा बनतो, याची प्रेरणादायक कहाणी या चित्रपटात दाखवण्यात आली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vikrant massey to play the villain in don 3 opposite ranveer singh psg