Zubin Garg Wife Garima Release His Last Film : प्रसिद्ध गायक झुबीन गर्ग यांचा काही दिवसांपूर्वीच स्कुबा डायव्हिंग करताना अपघाती मृत्यू झाला. २०-२१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी ते तिथे गेले होते. त्यांच्या निधनाने संगीतसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
२३ सप्टेंबर रोजी झुबीन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आसाममधील कमरकुची गावातील उत्तरी कॅरोलिना इथं झुबीन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांची पत्नी पार्थिवाच्या शेजारी हात जोडून बसली होती. पतीच्या निधनानंतर पत्नी गरिमा यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मात्र, यातून स्वत:ला सावरत त्या पतीचं राहिलेलं काम पूर्ण करणार आहेत.
पत्नी गरिमा झुबीन यांच्या शेवटच्या चित्रपटावर काम करत आहेत. ‘Roi Roi Binale’ असं या चित्रपटाचं नाव असून, येत्या ३१ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पती झुबीन यांच्या निधनानंतर गरिमा यांनी पहिल्यांदाच आपली भावुक प्रतिक्रिया दिली.
आजतकच्या वृत्तानुसार, एका वृत्तसंस्थेशी बोलताना गरिमा म्हणाल्या, “आता माझ्या आयुष्याचा एकच उद्देश आहे, झुबीन यांचा शेवटचा चित्रपट पूर्ण करणं. काहीही झालं तरी, मी हा चित्रपट पूर्ण करूनच रिलीज करणार. आम्ही ‘Roi Roi Binale’ या चित्रपटावर काम करत होतो. हा चित्रपट झुबीन यांचा शेवटचा प्रोजेक्ट आहे. ते ३१ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार करत होते. त्यामुळे मीदेखील तो चित्रपट त्याच तारखेला रिलीज करणार आहे.”
पुढे त्यांनी सांगितलं, “या चित्रपटात झुबीन यांनी अभिनय केला आहे. ते एका अंध कलाकाराची भूमिका साकारत होते. या भूमिकेसाठी ते खूप उत्सुक होते. हा चित्रपट एक सांगीतिक प्रेमकहाणी आहे. मला खंत वाटते की, या चित्रपटासाठी ते गायन करू शकले नाहीत. मात्र बाकीचं संगीत आणि इतर काम पूर्ण झालं आहे.”
दरम्यान, १९ सप्टेंबर २०२५ रोजी सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंगदरम्यान झुबीन गर्ग यांचं निधन झालं. ‘गँगस्टर’ सिनेमातील ‘या अली’ या गाण्याने त्यांना भारतभर ओळख मिळवून दिली. या गाण्यामुळे त्यांना बॉलीवूडमध्येही खूप यश मिळालं.