Deepshikha Nagpal about playing negative roles in movie : ‘ना उम्र की सीमा हो’, ‘सोन परी’सारख्या अनेक टीव्ही शोमध्ये आणि शाहरुख खानच्या ‘कोयला’, अनिल कपूरच्या ‘रिश्ते’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसणारी अभिनेत्री दीपशिखा नागपाल सध्या तिच्या मुलाखतीमुळे चर्चेत आहे.

या मुलाखतीत तिने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी लोकांबरोबर शेअर केल्या आहेत. याबरोबरच अभिनेत्रीने असेही सांगितले की, चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्याबद्दल लोक तिला जज करू लागले, ज्याचा तिच्यावर खूप परिणाम झाला. इतकेच नाही तर दीपशिखा नागपालने सांगितले की, ‘कोयला’ पाहिल्यानंतर तिच्या मुलीने सीडी तोडायला सुरुवात केली. चला जाणून घेऊया अभिनेत्री काय म्हणाली.

नकारात्मक भूमिका साकारण्याबद्दल दीपशिखाने काय म्हटले?

स्क्रीनच्या डिअर मी… सीझन २ ला दिलेल्या मुलाखतीत दीपशिखाने नकारात्मक भूमिका साकारण्याबद्दल सांगितले की, “बादशाहनंतर मला फक्त नकारात्मक भूमिकांची ऑफर आली. मला त्या करायच्या नव्हत्या, कारण लोक मला जज करू लागले. त्यावेळी नकारात्मक भूमिकांचा आदर केला जात नव्हता. ‘ये तो साइड अ‍ॅक्ट्रेस है, बुरे काम करती है’, जेव्हा तुम्ही या समाजात राहता तेव्हा तुम्हाला हे ऐकायचे नसते.”

“टीव्हीवरही नकारात्मक भूमिका मिळाल्या”: दीपशिखा नागपाल

अभिनेत्री पुढे म्हणाली, “टीव्हीवर मी टाइपकास्टिंगमुळे नकारात्मक भूमिका केल्या. ‘कोयला’ नकारात्मक होती – पण ‘बिंदिया’ नकारात्मक नव्हती. तिला शाहरुख आवडायचा, पण अमरीश पुरीबरोबर काम केल्यामुळे ती नकारात्मक होती. नंतर बादशाहमध्ये फक्त मी खलनायकाबरोबर असल्याने मी नकारात्मक होते, म्हणून टीव्हीनेही मला अशा भूमिका देण्यास सुरुवात केली. नकारात्मक भूमिका करणे खूप छान आहे, तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे, परंतु मला ते आवडत नव्हते, कारण लोक मला जज करत होते.”

दीपशिखा पुढे म्हणाली, “माझ्या आई-वडिलांचे निधन झाले होते, त्यामुळे मला मार्गदर्शन करणारे कोणीही नव्हते. माझे नातेवाईक सतत मला जज करायचे. लॉकडाऊनदरम्यान मी माझ्या कारकिर्दीवर विचार करत असे. मी इतके मोठे चित्रपट केले, पण जेव्हा मी शूटिंगवरून घरी आले तेव्हा कोणीही माझ्या कामाचे कौतुक केले नाही; त्याऐवजी मला सांगण्यात आले की तू काय केले आहेस? या चित्रपटात तू तुझे कपडे काढलेस… तू अशी आहेस, तुझी मुले तुझा आदर करणार नाहीत. मला लाज वाटली. मी स्वतःला प्रश्न विचारू लागले की मी ‘कोयला’ किंवा ‘बादशाह’ का केले.”

ती पुढे म्हणाली, “माझी मुलगी ‘कोयला’ची सीडी तोडायची. त्याचा माझ्यावर मानसिक परिणाम झाला. मला अपयश आल्यासारखे वाटले. मला शेवटी कळले की तुमच्या दुःखाला जागा नाही, म्हणून मी कधीही ते ओझे वाहून काम केले नाही. अभिनय माझ्यासाठी सुटकेचा मार्ग बनला, त्यामुळे मला बरे होण्यास मदत झाली.”

एक क्षण आठवत दीपशिखा म्हणाली, “माझे वडील खूप कडक होते, म्हणून माझा कोणताही बॉयफ्रेंड नव्हता, मी एक चांगली मुलगी होती, पण मासिकात आलेला कोणताही चुकीचा फोटो, कोणताही खळबळजनक मथळा किंवा कोणी मला घरी सोडायला आले तरी लोक मला जज करायचे आणि मी फक्त रडायचे. जर मी मीटिंगसाठी गेले आणि दार बंद असले तरी मी खूप चिंताग्रस्त व्हायचे, मला वाटायचे की बाहेरचे लोक काय विचार करत असतील. जेव्हा मी बाहेर पडायचे तेव्हा लोक माझ्याकडे विचित्रपणे पाहायचे, मी आत काय केले आहे असा विचार करत.”