Dhanush Reveals He Sold Flowers to Eat Idli : धनुषनं आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलं. धनुषनं त्याचा नवीन सिनेमा ‘इडली कढाई’च्या ऑडिओ लाँच सोहळ्याला लहानपणीच्या अनेक गोष्टी सांगितल्या. यावेळी धनुषनं सांगितलं की, तो इडली खरेदी करण्यासाठी फुलं कशी विकायचा. जेव्हा याबद्दल प्रश्न उपस्थित झाले तेव्हा त्यानं उत्तर दिलं की, जेव्हा त्यानं फुलं विकायला सुरुवात केली तेव्हा त्याचं कुटुंब कठीण परिस्थितीत होतं.
धनुष हा दक्षिण भारतातील प्रसिद्ध चित्रपट निर्माते कस्तुरी राजा यांचा मुलगा आहे. त्यामुळे धनुषनं इडलीसाठी फुलं विकली हे लोकांना मान्यच होत नव्हतं. एका मोठ्या कलाकाराच्या मुलाला कशी काय आर्थिक तंगी येऊ शकते, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला. दरम्यान, त्याबाबत धनुषनं स्पष्टीकरण दिलंय.
एका कार्यक्रमात बोलताना धनुष म्हणाला की, त्याच्या लहानपणी त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच वाईट होती. पुढे धनुष म्हणाला, “माझा जन्म १९८३ मध्ये झाला. माझ्या वडिलांनी १९९१ मध्ये त्यांचा पहिला चित्रपट बनवला. त्यांना चार मुलं आहेत आणि घराचं बजेट नेहमीच कमी होतं. आमचं शिक्षण हे आमचं पहिलं प्राधान्य होतं आणि आम्हाला आमच्या पॉकेटमनीसाठी काम करावं लागत असे. १९९५ च्या सुमारास आम्ही आर्थिकदृष्ट्या स्थिर झालो आणि आमची जीवनशैली सुधारली.”
धनुष नंतर म्हणाला, ‘लहानपणी इडली खायला मला खूप आवडायचं; परंतु ते खाण्यासाठी आमच्याकडे पैसे नसायचे. त्यामुळे आम्ही घराच्या आजूबाजूचे फुले गोळा करून ते विकायचो. त्यातून येणाऱ्या पैशाची इडली खायचो. त्यासाठी आम्ही पहाटे ४ वाजता उठून फुलं गोळा करायचो.’
धनुषचा ‘इडली कढाई’ हा चित्रपट १ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. धनुषनं या चित्रपटात अभिनय आणि दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात नित्या मेनन, अरुण विजय, राजकिरण व सत्यराज यांच्याही भूमिका आहेत.
२०१३ मध्ये रिलीज झालेल्या ‘रांझणा’ या चित्रपटाद्वारे धनुषनं बॉलीवूडमध्ये जबरदस्त एण्ट्री घेतली होती. या चित्रपटात धनुषबरोबर सोनम कपूरनंही मुख्य भूमिका साकारली होती. धनुष आणि सोनम कपूरव्यतिरिक्त ‘रांझणा’मध्ये अभय देओल, स्वरा भास्कर व झीशान अयुबसारखे कलाकारदेखील दिसले होते आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. आनंद एल. राय यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता.