धर्मेंद्र आणि हेमा मालिनी ही जोडी हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वांत आवडत्या जोड्यांपैकी एक आहे. या दोघांच्या प्रेमकथेने सर्वांची मने जिंकली आहेत. धर्मेंद्र यांनी दोन लग्ने केली आहेत. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीचे नाव प्रकाश कौर आहे; तर त्यांची दुसरी पत्नी ‘ड्रीमगर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेमा मालिनी आहेत.

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना ईशा व अहाना देओल या दोन मुली आहेत. पण, तुम्हाला माहीत आहे का की, एकदा धर्मेंद्र यांनी त्यांची पत्नी हेमा मालिनी यांच्या पहिल्या गरोदरपणाची बातमी गुप्त ठेवण्यासाठी असे काही केले होते, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले.

ईशाच्या जन्मावेळी धर्मेंद्र यांना खूपच काळजी वाटत होती. त्यावेळी ते पत्नी आणि होणाऱ्या बाळाबद्दल खूपच खबरदारी घेत होते. जेव्हा हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या पहिल्या बाळाचा जन्म होणार होता, तेव्हा संपूर्ण रुग्णालय बुक करण्यात आले होते. पत्नी आणि होणाऱ्या बाळाच्या सुरक्षेसाठी १०० खोल्या असलेले संपूर्ण रुग्णालय बुक करण्यात आले होते.

हेमा मालिनींसाठी बुक केलं गेलं होतं १०० खोल्यांचं नर्सिंग होम

हेमा मालिनी यांची जवळची मैत्रीण नीतू कोहली यांनी ‘जीना इसी का नाम है’ या शोमध्ये खुलासा केला होता, “जेव्हा ईशाचा जन्म होणार होता, तेव्हा हेमा गरोदर आहे, हे कोणालाच माहीत नव्हतं. म्हणून धरमजींनी ईशासाठी संपूर्ण हॉस्पिटल बुक केलं होतं. ते जवळपास १०० खोल्या असणारं एक नर्सिंग होम होतं.” हेमा यांनी २ नोव्हेंबर १९८१ रोजी त्यांची मोठी मुलगी ईशा देओलला जन्म दिला.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचे लग्न १९८० मध्ये झाले. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी एकत्र अनेक चित्रपट केले आहेत. असे म्हटले जाते की, या जोडप्याचे प्रेम प्रकरण ‘तुम हसीन मैं जवान’च्या सेटवर सुरू झाले होते. त्यानंतर त्यांनी १९८० मध्ये लग्न केले.

धर्मेंद्र यांचे आधीच प्रकाश कौर यांच्याशी लग्न झाले होते. सनी देओल व बॉबी देओल हे लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र आणि त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांचे पुत्र आहेत.