नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाची प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. ‘झुंड’ या चित्रपटाची अनेक चित्रपट समीक्षक तसेच कलाकार कौतुक करताना दिसत आहे. समाजाचे दुहेरी वास्तव दाखवणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दाखवली होती. या चित्रपटानंतर नागराज मंजुळेंचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका कार्यक्रमात नागराज मंजुळेंनी या चित्रपटाबाबत मत व्यक्त केले होते.

पुण्यात काही दिवसांपूर्वी कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या कविसंमेलनात नागराज मंजुळे यांनी कविता आणि चित्रपटाविषयी त्यांचे मत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले, “आता जी संस्कृती आहे ती फार विचित्र आहे. तिचे वय फार जुनं आहे आणि तुम्ही मात्र तिच्याशी जुन्या शस्त्रांनी लढत आहात. कवितेने किंवा चित्रपटांमुळे समाज बदलू शकते असे तुम्हाला वाटतं. पण तुम्ही फार भाबडे लोक आहात. पण तसं काहीही होणार नाही.”

“पण आपण लढत राहायला हवं. मी कवितेतून किंवा चित्रपटांच्या माध्यमातून मोकळा होत असतो आणि त्याचे थोडे फार पैसेही मिळतात. ही गोष्ट मला फार नंतर समजली. कवी होणं किंवा दिग्दर्शक होणं ही कधीच माझी महत्त्वाकांक्षा नव्हती. पण आतला जाळ मोकळा करत रहावं माणसांनी. लय थंडावा मिळतो जिवाला…”, असे नागराज मंजुळेंनी म्हटले.

‘झुंड’ चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, दहा दिवसात कमावले इतके कोटी

दरम्यान अभिनेता जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, सुबोध भावे यांच्यासह अनेक दिग्गज अभिनेत्यांनी ‘झुंड’ चित्रपटाबद्दल विविध पोस्ट शेअर करत त्याचे कौतुक केले आहे. झुंड हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या ४ मार्चला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. ‘झुंड’ या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाची कथा अनेक प्रेक्षकांना आवडली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला, त्यावेळी या चित्रपटाची कमाई संथगतीने सुरु होती. मात्र आता या चित्रपटाच्या कमाईमध्ये चांगलीच वाढ होताना दिसत आहे.

गेल्या शुक्रवारी म्हणजे ४ मार्चला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सातव्या दिवसापर्यंत ११.३० कोटींची कमाई केली आहे. झुंड या चित्रपटाने ११ मार्चला ८५ लाख रुपयांची कमाई केली आहे. त्यानंतर शनिवारी १२ मार्चला पुन्हा या चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आहे. शनिवारी चित्रपटाने १.३० कोटींचा गल्ला जमवला. त्यामुळे झुंड चित्रपटाची गेल्या दहा दिवसांची एकूण कमाई आता जवळपास १३. ५३ कोटी रुपयांच्या आसपास पोहोचली आहे.

‘झुंड’ चित्रपट पाहिल्यानंतर किरण मानेंची फेसबुक पोस्ट, म्हणाले “नागराज तू…”

‘झुंड’ हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. ‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. तर यानिमित्ताने आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु ही जोडी पुन्हा एकत्र पडद्यावर झळकत आहे.