इच्छामरण आणि वयस्कर लोकांना सध्या जाणवणारी एकाकी आयुष्याची भीती हे दोन्ही विषय खरंतर खूप महत्त्वाचे आहेत. कोणावरही आर्थिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या अवलंबून न राहता, सन्मानाने आजवर आपण आयुष्य जगलो, पण मृत्यूचं काय? वयोमानामुळे होणारे आजार किंवा अन्य कारणामुळे आयुष्याच्या सांजपर्वात दुर्बलतेने जगावं लागलं तर… हा विचारही सहन न होणाऱ्या एका वयस्कर जोडप्याचा दृष्टिकोन का आणि कसा बदलतो? याची गोष्ट ‘आतली बातमी फुटली’ या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक विशाल गांधी यांनी मांडली आहे. मात्र, इतकी चांगली कथाकल्पना अवाजवी मनोरंजनाच्या पसाऱ्यात पार हरवून गेली आहे.

दिग्दर्शक विशाल गांधी यांचा ‘आतली बातमी फुटली’ हा पहिलाच चित्रपट आहे. याआधी त्यांनी जाहिरात क्षेत्रात काम केलं आहे. मालिका दिग्दर्शन केलं आहे आणि निर्मितीही केली आहे, त्यामुळे दिग्दर्शनाचं तंत्र त्यांना अवगत आहे. मात्र, अनेकदा चांगला विषय हाताशी असला तरी तो मनोरंजनात्मक पद्धतीने म्हणजे विनोदी शैलीत मांडला तरच लोक ते पाहतील, असा एक समज दृढ आहे. आणि याच गैरसमजातून ‘आतली बातमी फुटली’ची मांडणी करण्यात आली आहे. ढोबळमानाने कथेचा विचार केला तर एक सामान्य रिक्षाचालक आणि त्याच्या मुलीची कथा एका बाजूला आहे. तर दुसऱ्या बाजूला वानखेडे नामक वयस्कर दाम्पत्याची कथा आहे. आणि मधल्या मध्ये वानखेडे ज्या चाळीत राहतात, तिथलं धूमशान मनोरंजनाच्या नावाखाली कोंबण्यात आलं आहे. सचिन गावडे या रिक्षाचालकाची मुलगी अचानक आजारी पडते, तिच्यावर तातडीने हृदयरोपणाची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यासाठी दहा लाख रुपये खर्च येणार आहेत. पैसे मिळवायचे सगळे अधिकृत मार्ग चोखाळून हरलेला सचिन शेवटी एका बँकेवर दरोडा टाकायचा निर्णय घेतो. फारच सहजतेने तो दरोडा टाकतो, पण बँकेतून बाहेर पडताना पोलिसांच्या नजरेत येतो. मागे लागलेल्या पोलिसांना गुंगारा देता देता सचिन अचानक वानखेडेंच्या चाळीत शिरतो आणि त्यांच्याच खोलीत घुसतो. मात्र, वानखेडेंच्या घरात काही वेगळंच प्रकरण शिजतं आहे ज्याची कुठलीही कल्पना नसलेला सचिन त्यात पूर्णपणे अडकतो.

थोडक्यात हा कथेचा प्रवास लक्षात घेतला तर कुठेही हा चित्रपट इच्छामरण या विषयाशी जोडलेला असेल, असा विचार तरी मनाला शिवतो का? फार फार तर एखाद्या गुन्ह्याची आणि त्यातल्या सहभागींची विनोदी किंवा रहस्यमय गुंतागुंत असेल असं आपल्याला वाटतं आणि त्याच धाटणीत दिग्दर्शकाने चित्रपटाची मांडणी केली आहे. त्यामुळे चित्रपटाचा पूर्वार्ध हा फक्त गोंधळाने भरलेला आहे. उत्तरार्धात आणि तेही शेवटच्या अर्ध्या तासात चित्रपटाचा मूळ विषय पात्रांच्या तोंडी येतो.

शेवटाकडे येताना चित्रपट क्षणाक्षणाला रंगत जातो आणि त्याचा शेवट हा खऱ्या अर्थाने चित्रपटाच्या विषयाला न्याय देणारा आहे. चित्रपटाचा शेवटचा भाग पाहताना खरोखरच इतक्या चांगल्या कल्पनेची अशी ठोकळेबाज मांडणी करण्य़ाचा अट्टहास कशासाठी? हा प्रश्न पडतो.

इच्छामरण याहीपेक्षा मृत्यू तितक्याच सन्मानाने मिळेल का? दोघांपैकी कोणी एकटा मागे उरला तर त्याचं आयुष्य तो कसा घालवेल? ही वृद्धांच्या मनातली भीती हा खरा विषय आहे. अर्थात, इथे वानखेडे दाम्पत्याला मूलबाळ नाही आणि नातेवाईकही फारसे नाहीत. त्यामुळे त्यांच्या मनातली शेवटाची भीती ही निराधार नाही, पण अर्थातच थोडं का होईना आयुष्य जगायला मिळावं, म्हणून मरणाच्या दारात असलेल्यांचा संघर्ष पाहिला की आपोआपच मरण ओढवून घेण्याची इच्छा पोकळ ठरते आणि हा या चित्रपटाचा खरा विषय आहे. मात्र, नको ती सुमार, अर्थहीन गाणी, नृत्यं आणि विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर यांच्यासारख्या उत्तम कलाकारांचं विनोदाच्या नावाखाली केलेलं हसं पाहवत नाही. त्यातल्या त्यात उत्तरार्धात खऱ्या अर्थाने मोहन आगाशे आणि रोहिणी हट्टंगडी या ताकदीच्या कलाकारांबरोबर सिद्धार्थ जाधवने अगदी सहजशैलीत साकारलेला निरागस सचिन, त्याचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे रसायन जमून आलं आहे. पण, त्याचा फायदा संपूर्ण चित्रपटाला होत नाही. रंजक शैली कुठल्या विषयासाठी आणि काय पद्धतीने वापरायला हवी, याचं थोडं भान असतं तर किमान एक उत्तम विषय तरी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या पदरी पडला असता.

आतली बातमी फुटली

दिग्दर्शक – विशाल गांधी

कलाकार – मोहन आगाशे, रोहिणी हट्टंगडी, सिद्धार्थ जाधव, विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, त्रिशा ठोसर आणि प्रीतम कागणे.