खासदार आणि अभिनेते डॉ.अमोल कोल्हे हे त्यांच्या अभिनयामुळे आणि राजकीय भूमिकांमुळे चर्चेत असतात. याबरोबरच ते सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवाजी महाराज आणि त्यांच्या इतिहासाबद्दल माहिती देत असतात. सध्या ते ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाटयाचे प्रयोग महाराष्ट्रात ठीकठिकाणी सादर करत आहेत. मात्र नुकतीच त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेली एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमोल कोल्हे यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका वृत्तपत्रातील एका बातमीचा फोटो शेअर केला आहे. या बातमीची हेडलाइन अशी आहे की अमोल कोल्हे लवकरच अभिनेत्री अमृता खानविलकरसह लग्नगाठ बांधणार आहेत. या मथळ्याखालील या बातमीचा फोटो अमोल कोल्हे यांनी शेअर केला आहे. या मूळ बातमीपेक्षा त्यातील शेवटची ओळ आणि डॉ.अमोल कोल्हे यांची पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

आणखी वाचा : ‘द फॅमिली मॅन’ वेबसीरिजविषयी मोठी अपडेट; मनोज बाजपेयी यांनी केला शूटिंगबद्दल खुलासा

डॉ. अमोल कोल्हे हे अभिनेत्री अमृता खानविलकरच्या प्रेमात पडले आहेत आणि लवकरच ते तिच्याशी लग्न करणार आहेत. इतकंच नव्हे तर अमृता हे नाव त्यांच्यासाठी लकी आहे आणि तिच्या लग्न केल्यामुळे ते उपमुख्यमंत्री होऊ शकतील असं अमोल कोल्हे यांनी वक्तव्य केल्याचा दावा या वृत्तपत्राच्या बातमीत केला आहे. या बातमीचा फोटो शेअर करत डॉ. अमोल कोल्हे लिहितात, “हा कोणता पेपर आहे ठाऊक नाही पण शेवटच्या ओळीतील क्रिएटिव्हिटी.. काय बोलावं? नशीब बायकोला आज १ एप्रिल आहे हे माहित होतं, नाहीतर संपादक महोदयांकडे जेवणाची सोय करावी लागली असती!”

अमोल कोल्हे यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी धमाल प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर काही लोक नाराज झाले आहेत. चक्क अभिनेत्री अमृता खानविलकरनेही ही पोस्ट वाचून “हे काय आहे??” अशी कॉमेंटदेखील केली आहे. काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांचा ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doctor amol kolhe shares a post of news of him getting married with amruta khanvilkar avn