एखाद्या लेखकाच्या कलाकृतीला मग ती कादंबरी असो किंवा कथा असो त्यावर नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तीनही माध्यमांतून सादर होण्याचे भाग्य लाभते. मराठीतील अभिजात व गाजलेल्या साहित्यकृतींवर आधारित सादर झालेल्या मालिका, चित्रपट आणि नाटक यांनाही प्रेक्षक पसंती लाभलेली आहे. गेल्या काही वर्षांत गाजलेल्या नाटकांवर आधारित चित्रपट तयार करण्याचा नवा प्रयोग समोर येत आहे.
नाटकावरून तयार केलेल्या या सिनेमात आता वि. वा. शिरवाडकर यांच्या ‘नटसम्राट’ या चित्रपटाची भर पडणार आहे. अभिनेते व निर्माते महेश मांजरेकर यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘नटसम्राट’ या चित्रपटात नाना पाटेकर, विक्रम गोखले व रिमा हे प्रमुख कालाकार आहेत. २७ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे चित्रपटाचा मुहूर्त होणार आहे. मराठी चित्रपट व नाटय़सृष्टीत सध्या या चित्रपटाची चर्चा आहे. नाटकातील ‘गणपतराव बेलवलकर’ आणि ‘कावेरी’ या भूमिका अनुक्रमे नाना पाटेकर व रिमा साकारत आहेत. नाना पाटेकर यांनी या भूमिकेची विशेष तयारी सुरू केली आहे. ‘नटसम्राट’ हे नाटक रंगभूमीच्या इतिहासात अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. दोन-चार वर्षांपूर्वी ‘माकडाच्या हाती श्ॉम्पेन’या नाटकावर आधारित ‘बदाम राणी गुलाम चोर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. लेखक-दिग्दर्शक केदार शिंदेच्या ‘लोच्या झाला रे’ या नाटकावर ‘खो खो’ हा चित्रपट तयार झाला. ‘नवा गडी नवं राज्य’ या गाजलेल्या नाटकावर ‘टाइमप्लीज’ हा चित्रपट येऊन गेला. महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत अत्यंत गाजलेल्या ‘बीपी’ या एकांकिकेवर ‘बालक पालक’ हा चित्रपट तयार झाला आणि तो गाजलाही. आता सध्या यावरील नाटक व्यावसायिक रंगभूमीवर सुरू आहे.
याअगोदर काही वर्षांपूर्वी ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘गारंबीचा बापू’, ‘तो मी नव्हेच’, ‘मोरूची मावशी’ या नाटकांवरही चित्रपट सादर झाले होते. नाटकावरून तयार करण्यात आलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रतिसाद संमिश्र स्वरूपाचा असतो. कधी नाटक गाजते, पण चित्रपट चालत नाही तर कधी नाटक पडते पण चित्रपट चालतो.
आधी कादंबरी, नाटक, चित्रपट
ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या ‘जौळ’ या कादंबरीला सर्व माध्यमांतून सादर होण्याचे भाग्य लाभले. या मूळ कादंबरीवरून ‘माझं काय चुकलं’ हे नाटक आणि ‘माझं घर माझा संसार’ हा चित्रपट तयार झाला होता. तसेच श्री. ना. पेंडसे यांच्या ‘गारंबीचा बापू’ या कादंबरीवरही नाटक, चित्रपट झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाना चित्रपटनिर्मितीत
मराठीत पहिल्यांदाच नाना पाटेकर चित्रपट निर्माता म्हणून लोकांसमोर येणार आहेत. महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’ या चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. या चित्रपटात नाना ‘नटसम्राट’ अप्पासाहेब बेलवलकरांची अजरामर भूमिका रंगवणार आहेत आणि याच चित्रपटासाठी निर्मात्याची नवीन भूमिकाही त्यांनी स्वीकारली आहे.
१९९१ मध्ये नाना पाटेकर यांनी ‘प्रहार’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यानंतर आता ‘अब तक छप्पन’चे दिग्दर्शन करण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला. याच वर्षी निर्माता म्हणून त्यांनी नवी सुरुवात करायचे ठरवले आहे. कुसुमाग्रजांच्या लेखणीतून उतरलेल्या ‘नटसम्राट’ अप्पासाहेब बेलवलकरांनी गेली कित्येक दशके  रंगभूमीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. नटसम्राटाची शोकांतिका आजही लोकांच्या मनात घर करून आहे. ‘नटसम्राट’ हे नाटक रुपेरी पडद्यावर आणण्याची घोषणा महेश मांजरेकर यांनी दोन वर्षांपूर्वी केली होती. हिंदीत अमिताभ बच्चन आणि मराठीत नाना पाटेकर नटसम्राटांची भूमिका साकारतील हेही निश्चित झाले होते. मात्र, काही केल्या या चित्रपटाला मुहूर्त मिळत नव्हता. २७ फेब्रुवारीला कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून नाशिकला कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drama turn into movie