पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित “पीएम नरेंद्र मोदी” हा चित्रपट २०१९मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आणखी एक चित्रपट येणार असल्याची माहिती महाभारतात युधिष्ठिर ही भूमिका साकारणारे अभिनेते गजेंद्र चौहान यांनी दिली आहे.

गजेंद्र चौहान यांनी काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या लूकमधील फोटो ट्विटर अकाऊंटवर शेअर करत चित्रपटाबाबत माहिती दिली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘एक और नरेन’ या चित्रपटात मी नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणार आहे. ही भूमिका साकारताना मला अभिमान वाटत आहे” या आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.

गजेंद्र यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये मागे ‘एक और नरेन’ या चित्रपटाचे पोस्टर दिसत आहे. या चित्रपटाची निर्मिती स्वप्नश्री प्रोडक्शन करणार असून चित्रपटाचे दिग्दर्शन मिलान भौमिक करणार आहेत. तसेच गजेंद्र हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित “पीएम नरेंद्र मोदी” हा चित्रपट २४ मे २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत होता. विवेकसोबतच या चित्रपटात बरखा बिश्त जशोदाबेन तर अभिनेते मनोज जोशी हे अमित शाह यांच्या भूमिकेत दिसला होता. याशिवाय बमन इराणी, झरीना वहाब, सुरेश ओबेरॉय आणि प्रशांत नारायणन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले आहे. या चित्रपटात बालपणापासून ते देशाचे पंतप्रधान होण्यापर्यंतचा नरेंद्र मोदींचा प्रवास दाखवण्यात आला आहे.