करोना पॉझिटिव्ह असतानाही शूटिंगला गेल्याप्रकरणी बॉलीवूड अभिनेत्री गौहर खान हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. करोनासंदर्भातल्या नियमांचं पालन न केल्यानं हा गुन्हा मुंबईतील ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता. यावरून आता गौहरला FWICE म्हणजेच फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने गौहरवर बंदी आणली आहे.

मुंबईतील ओशिवरा परिसरात राहणाऱ्या गौहरच्या करोना चाचणीचा अहवाल ११ मार्च रोजी आला होता. त्या अहवालात तिला करोना झाल्याचे समोर आले होते. त्यानुसार गौहरला तिच्या घरातच विलगीकरणात राहण्याचा निर्बंध लागू होता. तरी सुद्धा गौहरने करोनासंदर्भातल्या या नियमाचे पालन न करता चित्रीकरण केले. पालिकेच्या आरोग्य विभागाने तिच्या घरी जाऊन या प्रकाराची विचारपूस केली आणि नंतर त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

त्यानंतर लगेच FWICE ने गौहर खानच्या या निष्काळजीपणाची दखल घेऊन तिच्यावर मोठी कारवाई केली आहे. गौहरवर दोन महिन्यांसाठी बंदी घालण्याचा निर्णय FWICEने घेतला आहे.

“गौहर खान ही एक जागरुक नागरिक असून ती प्रशासनाच्या नियमांचं पालन करत आहे. तिचे अनेक रिपोर्ट्स निगेटिव्ह आल्यानंतर तिने चित्रीकरणाला जायला सुरुवात केली. त्यामुळे याप्रकरणी वेगवेगळे अंदाज बांधणाऱ्यांना विनंती आहे की हे प्रकरण आणखी वाढवण्याचा प्रयत्न करू नका.” असे स्पष्टीकरण तिच्या टीमने दिले होते.