डिज्नी प्लस हॉटस्टारने नुकतीच महत्वाकांक्षी वेब सीरिज ‘द एम्पायर’ची घोषणा केलीय. शूर योद्धावर आधारित ही वेब सीरिज असून यात अभिनेता कुणाल कपूर यात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. नुकतंच या सीरिजचा फर्स्ट लुक टीझर रिलीज करण्यात आलाय. या सीरिजमध्ये कुणाल कपूर एका शूर योद्धाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच रिलीज करण्यात आलेल्या या सीरिजच्या टीझरमध्ये कुणाल कपूर एका सम्राटच्या लुकमध्ये दिसून आला. या सीरिजच्या माध्यमातून कुणाल कपूर ओटीटी प्लॅटफॉर्मवर डेब्यू करणार आहे.

मिताक्षरा कुमार दिग्दर्शित ‘द एम्पायर’ या सीरिजमध्ये अभिनेता कुणाल कपूर हा कोणती भूमिका साकारणार याची प्रतिक्षा त्याच्या प्रेक्षकांना लागली होती. नुकतंच डिज्नी प्लस हॉटस्टारने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फर्स्ट लुक टीझर रिलीज करून प्रेक्षकांना या सीरिजमधल्या कुणाल कपूरच्या भूमिकेची एक झलक दाखवली आहे. “सिंहासनासाठी एका सम्राटचा शोध सुरू होतोय…लवकरच भेटीला येतोय” अशी कॅप्शन देत हा टीझर रिलीज करण्यात आलाय. या सीरिजचं प्रोडक्शन निखिल आडवाणी यांच्या ऐमी एंटरटेनमेंटने केलंय.

या वेब सीरिजबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता कायम ठेवण्यासाठी आणखी माहिती देण्याचं टाळण्यात आलंय. पण देशातली सर्वात मोठी ही वेब सीरिज असल्याचं बोललं जातंय. या सीरिजमध्ये एका साम्राज्याच्या उदयाची कहाणी दाखवण्यात येणार आहे. जितका ताकदवान तितकाच समजूतदार असलेला सम्राट दाखवण्यात आलाय.

या सीरिजबद्दल बोलताना अभिनेता कुणाल कपूर म्हणाला, “हे माझ्यासाठी एक आव्हान तर होतंच पण तितकंच मजेदार सुद्धा आहे. या सीरिजच्या निर्मात्यांनी कलाकारांच्या लुकसाठी बरीच मेहनत घेतली आहे. यातली भव्यता आणि राजेशाही थाट या व्यतिरिक्त यातील पात्र सुद्धा तितकेच दमदार आणि प्रेक्षकांना भावणारे आहेत.”