कोल्हापूर आणि सांगलीमध्ये सलग सहाव्या दिवशी पुराचा कहर सुरु आहे. आतापर्यंत येथून दोन लाखांपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. लष्कर आणि नौदलाच्या पथकातर्फे पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे सर्वतोपरीने प्रयत्न करत आहेत. तर प्रशासन, सामाजिक संस्था, अन्य जिल्ह्यातील नागरिक आणि मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. यामध्ये आता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळानेदेखील मदतीचा हात पुढे केला आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांना आवश्यक साधनसामग्रीचा पुरवठा करण्यासाठी १० ऑगस्ट ते १४ ऑगस्ट या कालावधीमध्ये एक मदतकेंद्र सुरु केलं आहे. मुंबई, पुणे आणि ठाणे या ठिकाणी हे मदत केंद्र सुरु करण्यात आलं आहे. ज्यांना कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांना मदत करण्याची इच्छा आहे, अशांनी या मदत केंद्रांवर जाऊन औषधे, कपडे, धान्य,चादरी,दूध भुकटी,कोरड्या खाण्याची पाकीट असे काही गरजेचे सामान जमा करावे. हे सारं सामान अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ गरजू पुरग्रस्तांपर्यंत पोहोचवणार आहेत.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने फेसबुकच्या माध्यमातून हा मदतीचा हात पुढे करत साऱ्यांनाच सहकार्य करण्याचे आवाहनही केले आहे.

दरम्यान, कोल्हापुरात कालपासून दीड फूट पाणी कमी झालं आहे. मात्र पावसाची संततधार सुरुच आहे. त्यामुळे लोकांना संकटांचा सामना करावा लागतो आहे. वीज नाही, घरात पाणी, रस्ते कोलमडलेले, पाणीच पाणी चहूकडे अशी स्थिती कायम आहे. अशात एकमेकांना हात देत संकटांचा सामना ग्रामस्थ आणि कोल्हापूरकर करत आहेत.