सध्या जगभर प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता टॉम क्रूझ याच्या ‘मिशन इम्पॉसिबल’ या चित्रपट शृंखलेतील ‘मिशन इम्पॉसिबल – द फायनल रेकनिंग’ या अखेरच्या चित्रपटाची चर्चा आहे. हा चित्रपट पुढच्या आठवड्यात अमेरिकेत प्रदर्शित होणार आहे, मात्र भारतात ६ दिवस आधीच १७ मे रोजी चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रसिद्धीमाध्यमांसमोर आलेल्या टॉम क्रूझने पुन्हा एकदा त्याच्या भारत प्रेमाची कबुली दिली आहे. मला भारतीय चित्रपट, संस्कृती आवडते, असे सांगणाऱ्या या हॉलीवूड अभिनेत्याने भारतात येऊन चित्रपट करायची इच्छा व्यक्त केली आहे.
टॉम क्रूझची मुख्य भूमिका असलेला ‘मिशन इम्पॉसिबल’ हा चित्रपट पहिल्यांदा १९९६ साली प्रदर्शित झाला होता. आता २०२५ मध्ये या चित्रपट शृंखलेतील आठवा आणि अखेरचा चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यात आला आहे.या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी फिरणाऱ्या टॉम क्रुझ याने प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना त्याच्या भारताविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. मी जेव्हा भारतात आलो होतो तेव्हा तिथे ताजमहाल पाहिला. मुंबईत अनेक ठिकाणी फिरलो, अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. माझ्या त्या भारतभेटीतला प्रत्येक क्षण मला आजही आठवतो. त्या आठवणी आजही माझ्या मनात रुंजी घालतात. भारत एक अद्भूत देश आहे, इथली संस्कृती खूप कमाल आहे, अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या. ‘मैं आप सबसे बहुत प्यार करता हूँ’ असे हिंदीत उच्चारून टॉमने भारतविषयीचे प्रेम व्यक्त केले.
हिंदी चित्रपट खूप आवडीचे
केवळ भारतप्रेमच नव्हे तर त्याने बॉलीवूडपटांविषयीही आपले प्रेम व्यक्त केले. ‘मला पुन्हा भारतात जायची इच्छा आहे. तिथे जाऊन मला एक चित्रपट बनवायचा आहे’, असे सांगतानाच बॉलीवूडचे चित्रपट मला खूप आवडतात, असेही त्याने म्हटले आहे. ‘बॉलीवूडमधले कलाकार ज्या सहजतेने अभिनय करतात, गाणं गाताना, नृत्य करताना दिसतात ते पाहायला खूप छान वाटतं. एखादं दृश्य सुरू असताना अचानक पडद्यावरचा माणूस गायला लागतो तेव्हा ते खूप सुंदर वाटतं. मी लहानपणापासून सांगीतिक कार्यक्रम पाहिलेले असल्याने मला तो प्रकार खूप आवडतो. त्यामुळे मला बॉलीवूडपट अधिक आवडतात. गाणं-नृत्य आणि अभिनय हे सगळं एकत्रित करता येणं हे खास कौशल्याचं काम आहे’, असं मतही टॉम क्रूझने व्यक्त केलं.
बॉलीवूड शैलीतील चित्रपट बनवण्याची आपली इच्छा पुन:पुन्हा व्यक्त करतानाच भारतभेटीसाठीही तो उत्सुक असल्याचं त्याने स्पष्ट केले आहे. बॉलीवूडमध्ये माझे खूप सारे मित्र आहेत, काही चांगल्या लोकांनाही तिथे भेटलो आहे. त्यामुळे लवकरात लवकर मला तिथे येऊन चित्रपट बनवायचा आहे, असंही टॉम क्रूझने जाहीर केलं आहे. ६२ वर्षीय टॉमचा ‘मिशन इम्पॉसिबल’ या चित्रपट शृंखलेतील अखेरच्या चित्रपटातही त्याने स्टंटदृश्ये करताना कोणतीही कसर ठेवलेली नाही. इथन हंट ही त्याची गाजलेली व्यक्तिरेखा आणि त्याचा थरार पुन्हा एकदा चित्रपटगृहात अनुभवायला मिळतो आहे. भारतात हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे.