अजय देवगणच्या ‘रेड’ (२०१८) या चित्रपटात इलियाना डिक्रूझने मालिनी नावाची भूमिका साकारली होती. ही भूमिका अजय देवगणच्या पत्नीची होती. या भूमिकेत इलियानालाही पसंती मिळाली. ‘रेड २’मध्ये इलियाना दिसली नाही. तिच्या जागी वाणी कपूर दिसली. या रिप्लेसमेंटबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या. आता इलियानाने या प्रकरणावर आपले मौन सोडले आहे.
… म्हणून तिने ‘रेड २’मध्ये काम करण्यास नकार दिला
अलीकडेच तिच्या इन्स्टाग्राम पेजवर चाहत्यांबरोबरच्या एका सेशनमध्ये, इलियानाने ‘रेड २’मध्ये काम न करण्याबद्दल तिची बाजू मांडली. “ती म्हणते की, चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माते माझ्याशी संपर्क साधत होते; परंतु मी सध्या माझ्या मुलाचे संगोपन करण्यात व्यग्र आहे म्हणून मी हा चित्रपट करू शकले नाही. ती म्हणाली, “मी तेव्हा नुकतेच माझ्या मुलाला जन्म दिला होता आणि आता माझे प्राधान्यक्रम वेगळे आहेत. इलियाना म्हणते की, मालिनीची भूमिका तिच्या हृदयाच्या खूप जवळ आहे.”
वाणी कपूरच्या अभिनयाबद्दल तिने काय म्हटले?
इलियानाने ‘रेड २’मध्ये तिच्या जागी आलेल्या अभिनेत्री वाणी कपूरचेही कौतुक केले. ती म्हणाली, “मी प्रोमोमध्ये वाणीला पाहिले होते, ती खूप सुंदर दिसत होती. मला खात्री आहे की, तिने तिच्या भूमिकेत तिची खास छाप सोडली असेल.”
इलियानाने नुकताच इन्स्टाग्राम एएमए सेशनमध्ये आई होण्याचा तिचा अनुभव शेअर केला. तिने सांगितले की, मातृत्व हा सर्वांत कठीण; पण सर्वांत सुंदर अनुभव आहे. जेव्हा चाहत्यांनी इलियानाला विचारले की, ती भविष्यात चित्रपटांमध्ये दिसणार का? तेव्हा तिने उत्तर दिले की, ती भविष्यात नक्कीच चित्रपटांमध्ये काम करेल. इलियानाचा शेवटचा चित्रपट ‘दो और दो प्यार’ होता. हा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित झाला होता.
इलियानाने २०२३ मध्ये मायकल डोलनशी लग्न केले आणि ऑगस्टमध्ये तिच्या मुलाला जन्म दिला. अलीकडेच तिने तिच्या दुसऱ्या गरोदरपणाची घोषणा केली, ज्यामुळे चाहते उत्साहित झाले आहेत.
‘रेड २’ हा चित्रपट १ मे २०२५ रोजी प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करीत आहे. या चित्रपटात अजय देवगणने अमय पटनायकची भूमिका पुन्हा साकारली आहे; तर रितेश देशमुख आणि वाणी कपूर यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. २०१८ मध्ये आलेल्या ‘रेड’ चित्रपटात इलियानाने मालिनीची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांना खूप आवडली होती.