भारतीय बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिचा होणारा पती एक दाक्षिणात्य अभिनेता आहे. त्याने त्यांच्या लग्नाची तारीख नुकतीच जाहीर केली आहे.

ज्वाला गुट्टाचा भावी पती एक दाक्षिणात्य अभिनेता आहे. विष्णू विशाल असं त्याचं नाव आहे. त्याने आपल्या ट्विटर हँडलवरुन ही लग्नाची बातमी शेअर केली आहे. येत्या २२ एप्रिल रोजी ते दोघे लग्न करणार आहेत. त्याने याबद्दल ट्विट करत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो म्हणतो, “परिवाराच्या शुभाशीर्वादांसह आणि आनंदाने आम्ही हे जाहीर करत आहोत की आम्ही लग्न करत आहोत. हा एक खाजगी सोहळा असेल जो आप्तेष्टांच्या उपस्थितीत पार पडेल. तुमच्या प्रेमाबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. आमच्या या आजवरच्या प्रेमाच्या, मैत्रीच्या प्रवासात आमच्यावर प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल तुमचे धन्यवाद.”

या फोटोला त्याने कॅप्शनही दिलं आहे. यात तो म्हणतो, “आयुष्य हा एक प्रवास आहे. विश्वास ठेवा आणि पुढचं पाऊल टाका. तुमच्या प्रेमाची आणि पाठिंब्याची गरज आहे.”

गेल्या वर्षी ज्वाला आणि विशाल यांचा साखरपुडा झाला होता. ज्वालाच्या वाढदिवसादिवशी तिला सरप्राईझ देत विष्णूने तिला लग्नासाठी विचारलं होतं. त्याने आपल्या या खास क्षणांचे काही फोटोही शेअर केले होते.

राणा डुग्गाबाटीसोबतचा ‘अरण्य’ हा विष्णूचा शेवटचा प्रोजेक्ट होता. आता तो ‘एफआयआर’, ‘मोहनदास’ आणि ‘इंद्रू नेत्रू नालई २’ मध्ये दिसणार आहे.