जया बच्चन या त्यांच्या रागीट स्वभावामुळे ओळखल्या जातात. अनेकदा फोटो काढण्यावरून त्या चाहते आणि पापाराझींवर चिडलेल्या पाहायला मिळतात. जया बच्चन यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या हसताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये जया बच्चन त्यांची बाजू मांडताना दिसत आहेत, ज्यामुळे लोक हसत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला जया बच्चन यांचा हा व्हिडीओ जुना आहे. जया बच्चन अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या, जिथे त्यांनी हसून पॅप्ससमोर पोज दिली.
मी नेहमीच फोटो द्यायला तयार असते; पण… : जया बच्चन
नेहमीप्रमाणे पापाराझी जया बच्चन यांचे फोटो काढायला तयार होते; पण व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये त्या रागावल्या नाहीत, त्यांनी काहीतरी वेगळे केले. त्यांनी केवळ पोजच दिली नाही, तर त्यांच्याकडे जाऊन त्यांचा मुद्दा मांडला. व्हिडीओमध्ये जया म्हणतात, “मी नेहमीच फोटो द्यायला तयार असते; पण जेव्हा काही वैयक्तिक घडते तेव्हा तुम्ही लोक गुप्तपणे फोटो काढता, जे मला आवडत नाही. मी किती हसते बघा”.
जया यांचे हे शब्द ऐकल्यानंतर, जेव्हा एका पापाराझीने त्याच्या साथीदाराला अनौपचारिक गप्पा रेकॉर्ड करणे थांबवण्यास सांगितले, तेव्हा जया यांनी हसत हसत त्याला गप्प राहण्यास सांगितले आणि पुढे म्हणाल्या, “जेव्हा मी तयार असते, तेव्हा काही हरकत नाही… जेव्हा मी तयार नसते आणि तुम्ही लोक फोटो काढता, तेव्हा… रंग बाहेर येतात.”
जया बच्चन यांचा हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर युजर्स प्रतिक्रिया देत आहेत. अनेक युजर्सनी असेही म्हटले की, कदाचित त्यांच्या सुपरस्टार पतीने त्यांना हे समजावून सांगितले असेल. एका युजरने लिहिले- “अमिताभ बच्चन यांनी क्लास घेतला आहे.” हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
जया बच्चन सध्या त्यांच्या राजकीय जबाबदाऱ्यांमध्ये व्यग्र आहेत. चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, जया शेवटच्या करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसल्या होत्या, ज्यामध्ये त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.