Johnny Lever takes dig at todays actors and comedians : अभिनेता जॉनी लिव्हर यांच्या अभिनयाचे खूप चाहते आहेत. बॉलीवूडचे प्रसिद्ध कॉमेडियन जॉनी लिव्हर यांनी अलीकडेच चित्रपट आणि स्टँडअप कॉमेडीमधील बदलांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे आणि चिंताही व्यक्त केली आहे.
जॉनी लिव्हर यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि अनेक दशकांपासून ते त्यांच्या उत्तम विनोदाने प्रेक्षकांना हसवत आहेत. आता अलीकडेच एका मुलाखतीत, जॉनी लिव्हर यांनी आजकाल विनोदात असभ्यता आणि द्वयर्थी विनोदांबद्दल निराशा व्यक्त केली आहे.
हॉलीवूडला कॉपी करतात कलाकार : जॉनी लिव्हर
कुनिका सदानंदच्या यूट्यूब चॅनलवर जॉनी लिव्हर म्हणाले, “हॉलीवूड चित्रपटांमुळे आजकाल लोक उघडपणे शिवीगाळ करत आहेत. पाश्चिमात्य देशांमध्ये अश्लील भाषा वापरणे व अश्लील विनोद करणे सामान्य बाब आहे आणि आता आपले अभिनेते व विनोदी कलाकारदेखील त्यांना कॉपी करू लागले आहेत. त्यांना एक सवय लागली आहे. ते आता फक्त इंग्रजी चित्रपट पाहतात.”कुनिका त्यांच्याशी सहमत झाली आणि म्हणाली, “त्यांच्यापैकी अनेकांना आता हिंदीही नीट येत नाही.”
जॉनी लिव्हर यांनी पुढे स्पष्ट केले की, या बदलाचा संवेदनशीलतेवर कसा परिणाम झाला आहे. “ते हॉलीवूडकडून सर्व काही शिकतात. सर्व काही ठीक होईल. त्यामुळे काय फरक पडतो’ असा विचार करतात. अशा प्रकारे डबल मीनिंगचे विनोद इतके सामान्य झाले आहेत.”
जॉनी लिव्हर इथेच थांबले नाहीत, ते पुढे म्हणाले, “आजकाल बहुतेक स्टँडअप कंटेंट डबल मीनिंगने भरलेले आहेत. पण, जेव्हा आम्हाला या कलेचे प्रशिक्षण देण्यात आले तेव्हा आम्हाला कधीही हा मार्ग अवलंबू नका, असे शिकवण्यात आले. जर आम्ही डबल मीनिंगने बोलू लागलो, तर या लोकांची आमच्यासमोर उभे राहण्याची लायकी नसेल; पण आम्ही तो मार्ग कधीच निवडला नाही.”
त्यांनी आजच्या कॉमेडियन्सना एक छोटेसे आव्हान दिले. ते म्हणाले, “जर ते खरोखरच प्रतिभावान असतील, तर मी त्यांना काहीतरी चांगले बोलून लोकांना हसवण्याचे आव्हान देतो. हीच खरी परीक्षा आहे. मी असे म्हणत नाही की, ते वाईट आहेत. लोक त्यांच्या कंटेंटचा आनंद घेत आहेत; पण माझे कुटुंबीय प्रेक्षक आहेत. मला त्यासाठी जबाबदार राहावे लागेल.” त्यांनी सांगितले की, त्यांची मुलगी जिमी लिव्हरनेही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवलेय. ती एकल शो करते आणि अश्लीलतेचा अवलंब करीत नाही.