कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माने आजवर त्याच्या विनोदांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय. कपिल शर्माचे आज लाखो चाहते आहेत. अनेक कॉमेडी शोमध्ये सहभाग घेत कपिलने चाहत्यांची पसंती मिळवली. त्यानंतर अखेर स्वत:च्या नावाने शो सुरु करत कपिलने यशाचं शिखर गाठलं आहे. मात्र त्याच्या या प्रवासात त्याला अनेक अडथळे देखील आले होते. सुरुवातीच्या काळात कपिलने बराच संघर्ष केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेकांना या गोष्टीची कल्पनादेखील नसेल पण कपिल शर्माने सनी देओल आणि अमिषा पटेलच्या सुपरहिट ठरलेल्या ‘गदर- एक प्रेम कथा’ या सिनेमात काम केलं होतं. मात्र कपिलच्या एका वर्तनामुळे त्याचा सिनेमातील सीन कट करण्यात आला होता. ‘द कपिल शर्मा शो’ च्या एका भागात अभिनेता सनी देओलने हजेरी लावली होती. या खास भागात कपिलनेच या गोष्टीचा खुलासा केला होता.

कपिल शर्मा या शोमध्ये म्हणाला की जेव्हा अमृतसरमध्ये ‘गदर’ सिनेमाचं शूटिंग सुरु होतं तेव्हा एक अफवा पसरली होती. जो कुणी या शूटिंगमध्ये सामिल होईल त्याला सनी देओलला भेटण्याची संधी मिळेल अशी ती अफवा होती. त्यामुळे कपिल शर्मा शूटिंगच्या ठिकाणी पोहचला. मात्र तेव्हा त्याला कळालं की त्या दिवशी अमरीश पुरी आणि अमीषाचा फक्त सीन होता. दुसऱ्या दिवशी कपिल पुन्हा मित्रासह शूटिंगला पोहचला.

कपिल आणि त्याच्या मित्राला एका सीनमध्ये घेण्यात आलं. यात त्यांच्या हातात मोठं पातेलं होतं. सीननुसार त्यांना ट्रेन सुरु होताच जोरात पळायचं होतं आणि चालत्या ट्रेनमध्ये चढायचं होतं. कपिल दोन तीनदा ट्रोनमध्ये चढला मात्र नंतर त्याच्या लक्षात आलं की गर्दीचा सीन असल्याने तो गर्दीत दिसणार नाही त्यामुळे त्याने एक युक्ती लढवली.

कपिल शर्माला दिग्दर्शकाने खडसावलं
कपिलने या सीनच्या पुढच्या टेकला असं काही केलं की त्याला दिग्दर्शकाचा ओरडा खावा लागला. दिग्दर्शकाने अॅक्शन म्हणताच ज्या दिशेने गर्दीसोबत पळायचं होतं त्या दिशेने न पळता कपिल विरुद्ध दिशेने पळू लागला. त्यानंतर दिग्दर्शकाने त्याला चांगलचं खडसावलं.

सिनेमा रिलीज झाल्यानंतर कपिल मित्रांसोबत मोठ्या आनंदात सिनेमा पाहण्यासाठी गेला होता. मात्र कपिलला तो ज्या सीनमध्ये होता तो सीनचं दिसला नाही. त्यामुळे सिनेमातून सीन कट केल्याचं त्याच्या लक्षात आलं. हा संपूर्ण किस्सा कपिलने सनी देओलसोबत त्याच्या शोमध्ये शेअर केला होता. हा किस्सा ऐकून सनीदेखील थक्क झाला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kapil sharma worked in sunny deol and amisha patel starer gadar film but his scene was cut in movie kpw