Leena Bhagwat & Mangesh Kadam Talk About Not Having Children : अभिनेत्री लीना भागवत व अभिनेते मंगेश कदम ही मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी आहे. दोघांनीही आजवर रंगभूमीवर अनेक नाटकांमध्ये काम केलं आहे. तिथेच त्यांनी एकमेकांना पसंत केलं आणि पुढे लग्नही केलं. अशातच आता त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगितलं आहे.
लीना भागवत व मंगेश कदम ही रंगभूमीवरील मोठी नावं आहेत. मंगेश यांनी अनेक नाटकांचं दिग्दर्शन केलं आहे; तर काहींमध्ये कामही केलं. लीना यांनीसुद्धा नाटक, मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. अशातच आता त्यांनी नुकतीच ‘अनुरूप विवाह संस्था’ला मुलाखत दिली असून, त्यामध्ये त्यांनी त्यांच्या लग्नाबद्दल, तसेच लग्नानंतर मूल न होऊ देण्याबद्दलच्या निर्णयाबद्दल सांगितलं आहे.
लीना भागवत व मंगेश कदम यांची मूल न होऊ देण्याबद्दल प्रतिक्रिया
लीना भागवत व मंगेश कदम यांच्या लग्नाला १३ वर्षं झाली आहेत. दोघांचा प्रेमविवाह आहे. नाटकादरम्यानच दोघांनी एकमेकांना पसंत केलं होतं आणि पुढे अनेक वर्ष ते एकमेकांना ओळखतही होते. नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल लीना म्हणाल्या, “आमचं लग्नाच्या अनुषंगाने काही गोष्टी ठरलेल्या होत्या. त्यातलं एक म्हणजे मूल न होऊ देणं. मूल न होऊ देण्याचा निर्णय हा आम्ही एकमेकांच्या सहमतीनं घेतलेला निर्णय आहे.”
मंगेश कदम याबद्दल पुढे म्हणाले, “आम्ही खूप उशिरा लग्न केलं. त्यामुळे लग्नानंतर जर हिला मूल झालं असतं ,तर त्याच्यामध्ये अजून तीन-चार वर्षं तिला काहीच करता आलं नसतं आणि ते फार महत्त्वाचं होतं आणि म्हणून म्हटलं की कशासाठी? तू आणि मी आनंदासाठी एकत्र आलो आहोत. मग तुझा आनंद कशात आहे ते तू कर ना, आपल्याला काहीच हरकत नाही आणि असंही माझं आडनाव काही भोसले वगैरे नाही की, ते पुढे चालत राहिलं पाहिजे कदम आडनाव आहे. हळूहळू जाऊयात पुढे”
लीना भागवत पुढे म्हणाल्या, “आमचं आधीपासूनच ठरलेलं आणि पहिली गोष्ट मी म्हटलेलं की, मला आता ब्रेक घ्यायचा नाहीये. दुसरी गोष्ट आपण आपल्या मुलाना काय देऊ शकणार आहोत. काय पद्धतीचं शिक्षण देऊ शकणार आहोत, काय सुरक्षितता देऊ शकणार आहोत, त्यांना आपण काय पद्धतीचं आयुष्य देऊ शकू? या सगळ्या गोष्टीचा विचार करता, आपण खरंच आता तितके सक्षम आहोत का की, ज्या प्रकारे आपल्या आई-वडिलांनी आपल्याला सगळ्या गोष्टी दिल्या, त्या आपण देऊ शकू का? त्यामुळे आम्ही दोघांनी छान शांतपणे निर्णय घेतला. दोघांचीही त्याला सहमती होती.”