जेव्हा आपण जुन्या अभिनेत्रींबद्दल बोलतो तेव्हा त्यांच्या चित्रपट आणि पुरस्कारांव्यतिरिक्त, त्यांच्या आयुष्यातील अनकहीत कथा आणि अनुभवांचा उल्लेखदेखील केला जातो.

मीना कुमारी यांच्या आयुष्यात एक अशी घटना घडली होती ज्याने केवळ निर्मात्यांनाच नव्हे तर त्यांच्या चाहत्यांनाही धक्का बसला होता. ही घटना घडली तेव्हा मध्य प्रदेशच्या दऱ्याखोऱ्यात शूटिंगदरम्यान त्यांना खऱ्या दरोडेखोरांचा सामना करावा लागला होता. त्यांनी अभिनेत्रीला चाकू दाखवला आणि तिच्याकडून एक विचित्र मागणी केली. काय घडले ते आम्ही तुम्हाला सांगतो.

‘ट्रॅजेडी क्वीन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मीना कुमारी यांचे खरे नाव माहजबी बानो आहे, परंतु इंडस्ट्रीने त्यांचे नाव मीना कुमारी ठेवले. माहजबी बानो यांचा जन्म १ ऑगस्ट १९३३ रोजी झाला. मीना यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील अजिबात आनंदी नव्हते, कारण त्यांना मुलगा हवा होता. मीना यांच्या जन्मानंतर त्यांना एका अनाथाश्रमात ठेवण्यात आले होते, परंतु काही तासांनी त्यांनी आपला विचार बदलला आणि तिला घरी परत आणले.

मीना कुमारी यांना चित्रपटांची आवड नसली तरी अभ्यास टाळण्यासाठी त्या त्यांच्या पालकांबरोबर फिल्म स्टुडिओमध्ये जात असत. एके दिवशी दिग्दर्शक विजय भट्ट यांनी त्यांना ‘लेदरफेस’ चित्रपटात कास्ट केले. या चित्रपटात काम करण्यासाठी त्यांना २५ रुपये मिळाले होते. त्यावेळी त्या फक्त चार वर्षांच्या होत्या. चित्रपटानंतर मीना यांना शाळेत प्रवेश मिळाला आणि त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर १९५२ मध्ये ‘बैजू बावरा’ चित्रपटातून मुख्य अभिनेत्री म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘परिणीता’, ‘दिल एक मंदिर’, ‘फूटपाथ’, ‘शारदा’, ‘साहिब बीबी और गुलाम’, ‘काजल’, ‘फूल और पत्थर’, ‘मैं चुप रहूँगी’, ‘दो बिघा जमीन’, ‘चांदणी चौक’, ‘मेम साहिब’, ‘दिल अपना और प्रीत पराई’, ‘आरती’, ‘बहू बेगम’ आणि ‘पाकीजा’ असे यशस्वी चित्रपट केले.

‘परिणीता’ चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट फिल्मफेअर अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. याशिवाय, ‘साहिब बिवी और गुलाम’ चित्रपटासाठी त्यांनी चार फिल्मफेअर पुरस्कार जिंकले. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मनोरंजक घटनांपैकी एक मध्य प्रदेशशी संबंधित आहे, जेव्हा त्यांनी डाकूंच्या हातावर चाकूने ऑटोग्राफ दिले होते.

मीना कुमारी यांच्याबरोबर नेमकं काय घडलेलं?

प्रसिद्ध पत्रकार विनोद मेहता यांनी मीना कुमारी यांचे चरित्र ‘मीना कुमारी – अ क्लासिक बायोग्राफी’ लिहिले, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “आउटडोअर शूटिंगसाठी कमाल अमरोही (मीना कुमारी यांचे पती आणि चित्रपट निर्माते) अनेकदा दोन कारने जात असत. एकदा दिल्लीला जात असताना मध्य प्रदेशातील शिवपुरीमध्ये त्यांच्या गाडीचे पेट्रोल संपले. अमरोही यांनी मीना कुमारींना सांगितले की आपण रस्त्यावर गाडीत रात्र घालवू. त्यांना माहीत नव्हते की हा डाकूंचा परिसर आहे. मध्यरात्रीनंतर सुमारे १२ डाकूंनी त्यांच्या गाड्या घेरल्या. त्यांनी गाड्यांमध्ये बसलेल्या लोकांना खाली उतरण्यास सांगितले. कमाल अमरोही यांनी गाडीतून खाली उतरण्यास नकार दिला आणि म्हणाले की, ज्याला मला भेटायचे आहे त्याने माझ्या गाडीकडे यावे.

ते पुढे म्हणाले, “थोड्या वेळाने, रेशमी पायजमा आणि शर्ट घातलेला एक माणूस त्यांच्याकडे आला. त्याने विचारले, ‘तू कोण आहेस?’ अमरोही म्हणाले, ‘मी कमाल आहे आणि मी या भागात शूटिंग करत आहे. आमच्या गाडीचे पेट्रोल संपले आहे.’ डाकूला वाटले की तो रायफल शूटिंगबद्दल बोलत आहे. पण, जेव्हा त्याला सांगण्यात आले की हे एका चित्रपटाचे शूटिंग आहे आणि मीना कुमारीदेखील दुसऱ्या गाडीत बसली आहे, तेव्हा सर्व डाकूंचा दृष्टिकोन बदलला. डाकूंच्या नेत्याने लगेच सर्वांसाठी संगीत, नृत्य आणि जेवणाची व्यवस्था केली. त्याने त्यांना झोपायला जागा दिली आणि सकाळी त्यांच्या गाडीसाठी पेट्रोल मागवले.

सकाळी मीना कुमारी त्यांच्या टीमसह तिथून निघाल्या तेव्हा डाकूंच्या नेत्याने मीना कुमारी यांना एक धारदार चाकू दाखवला, ज्यामुळे त्या क्षणभर घाबरल्या, पण त्याने त्या धारदार चाकूने त्यांचा ऑटोग्राफ मागितला, कसा तरी मीना कुमारीने ऑटोग्राफ दिला. पुढच्या शहरात गेल्यावर त्यांना कळले की तो अमृत लाल आहे, जो त्यावेळी मध्य प्रदेशचा एक प्रसिद्ध डाकू होता. १९५२ मध्ये मीना कुमारी यांनी दिग्दर्शक कमाल अमरोहीशी लग्न केले आणि ३१ मार्च १९७२ रोजी वयाच्या ३८ व्या वर्षी मीना कुमारी यांचे यकृताच्या सिरोसिसमुळे निधन झाले.