"मी ५ लाख घेतले पण..." फसवणुकीच्या आरोपावर अभिनेते सयाजी शिंदेंनी सोडलं मौन | Marathi Actor Sayaji Shinde Filed Complaint Against Producer Sachin Sasane Who Accused Him Of money fraud nrp 97 | Loksatta

“मी ५ लाख घेतले पण…” फसवणुकीच्या आरोपावर अभिनेते सयाजी शिंदेंनी सोडलं मौन

मला रात्री-अपरात्री फोन करणे, फोनवर शिवीगाळ करणे, आत्महत्या करत असल्याचे व्हिडीओ पाठवणे, असे आरोपही सयाजी शिंदेंनी केले आहेत.

“मी ५ लाख घेतले पण…” फसवणुकीच्या आरोपावर अभिनेते सयाजी शिंदेंनी सोडलं मौन
सयाजी शिंदे यांचे स्पष्टीकरण

हिंदी, दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटात आपल्या दमदार अभिनयामुळे घराघरांत पोहोचलेले अष्टपैलू अभिनेते म्हणून सयाजी शिंदे यांना ओळखले जाते. ते गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. काही दिवसांपासून वाई येथील दिग्दर्शक-निर्माते सचिन बाबुराव ससाणे यांनी त्यांच्यावर फसवणुकीचे आरोप केले आहेत. सयाजी शिंदे यांनी माझ्याकडून पाच लाख रुपये घेतले पण चित्रपटात कामच केले नाही, असा आरोप सचिन ससाणे यांनी केला आहे. आता या प्रकरणी अभिनेते सयाजी शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

सयाजी शिंदे यांनी याप्रकरणी सातारा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत सयाजी शिंदे यांनी ससाणेचे सर्व आरोप फेटाळले. तसेच ससाणेविरोधात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. सयाजी शिंदे यांनी ४ डिसेंबर २०२२ रोजी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
आणखी वाचा : Video: मुंबईतील उड्डाणपुलावर बेचकीच्या सहाय्याने बगळ्यांची शिकार, सयाजी शिंदेंनी व्यक्त केला संताप

सयाजी शिंदे यांनी सातारा पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, “साताऱ्यातील सचिन ससाणे याने मला त्याच्या ‘गिन्नाड’ चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी विचारणा केली होती. याचा मोबदला म्हणून त्यांनी मला २५ लाख रुपये देण्याची विनंती केली होती. ही विनंती मान्य करून मी या चित्रपटासाठी ५ लाख रुपये स्वीकार केले. त्यानंतर तीन दिवस या चित्रपटाचे शूटींगही केले.” 

“ससाणेला चित्रपट दिग्दर्शनाचे पुरेसे ज्ञान नाही, तसेच त्याने केलेली स्क्रिप्टही सशक्त नव्हती, तसेच आर्थिक नियोजन बरोबर नाही, अनुभवी क्रू मेंबर्स नाही, या सर्व बाबींमुळे दिग्दर्शनाच्या कामात सतत विलंब झाला. यानंतर ससाणेने आश्वासन दिलेले की आवश्यक ते बदल करून शूटिंग केले जाईल, पण तसे झाले नाही. त्यानंतर तीन वेळा शूटींग पुढे ढकलण्यात आले. या ढिसाळ नियोजनामुळे चित्रपटाचे कामकाज अस्ताव्यस्त होऊन ठप्प झाले”, असा आरोपही सयाजी शिंदे यांनी केला आहे.

आणखी वाचा : “जिथे जीव वाचवले जातात तिथं १५८ जीव मारण्याची परवानगी मिळतेच कशी?”, सायन रुग्णालयातील वृक्षतोडीवर अभिनेते सयाजी शिंदेचा संताप

त्यापुढे सयाजी शिंदे म्हणाले, “या प्रकारामुळे त्यांनी इतर चित्रपटांसाठी दिलेल्या तारखा आणि वेळ यामध्येही गोंधळ झाला. यावेळी त्यांचे तब्बल ५० लाखांचे नुकसान झाले. त्यावेळी त्याचा चित्रपट आणि आगाऊ रक्कम उगाच स्विकारली. त्याचवेळी रक्कम परत दिली असती तर बरे झाले असते. त्याला उर्वरित २० लाखांची रक्कम द्यावी लागू नये म्हणून त्याने वाई पोलीस स्टेशन आणि अखिल भारतीय चित्रपट मंडळात नाहक तक्रार दिली.”

“इतकंच नव्हे तर सचिन ससाणे मला वारंवार रात्री-अपरात्री फोन करणे, फोनवर शिवीगाळ करणे, आत्महत्या करत असल्याचे व्हिडीओ पाठवणे, जीवे मारण्याची धमकी देणे असे प्रकारही करत होता, असा आरोप सयाजी शिंदेंनी केला आहे. त्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी” अशी मागणी सयाजी शिंदेंनी केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

वाई येथील दिग्दर्शक-निर्माते सचिन बाबुराव ससाणे यांच्याकडून सयाजी शिंदेंनी चित्रपटात काम करतो असे सांगून पैसे घेतले होते. मात्र काम केले नाही. तसेच त्यांनी घेतलेले ५ लाख परत केले नाहीत. या घडलेल्या प्रकाराबद्दल ससाणेने वाई पोलिसांमध्ये आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळात तक्रार दाखल केली होती.

तसेच त्याने फेसबुक आणि युट्यूबवर ०३ डिसेंबर रोजी एक पोस्ट केली होती. त्यात सयाजी शिंदेंनी त्याची फसवणूक केली आहे, असा आरोप केला होता.  

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 12:02 IST
Next Story
“माझ्या काही रिलेशनशिप्स…” दिव्या अग्रवालचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर