छोट्या पडद्यावरील ‘फुलपाखरु’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून हृता दुर्गुळेला ओळखलं जाते. हृताने ‘फुलपाखरु’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली. ती नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अशी तिची ओळख आहे. हृता ही सध्या विविध चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहे. ‘अनन्या’, ‘टाईमपास ३’ यांसारख्या अनेक चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती व्यस्त असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे तिला विविध प्रोजेक्ट सोडण्यावरुन ट्रोल केलं जात आहे.
हृता दुर्गुळे ही फुलपाखरु या मालिकेतून घराघरात पोहोचली. त्यानंतर तिने छोट्या पडद्यावरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत दिपूची भूमिका साकारताना दिसत आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यासोबतच ‘दादा एक गुडन्यूज आहे’ हे नाटकातही ती दिसणार नाही. सलग दोन महत्त्वाच्या प्रोजेक्टमधून एक्झिट घेतल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.
हृताचा पती प्रतिक शाह याच्या सांगण्यानुसार तिने हे प्रोजेक्ट सोडल्याचा आरोपही काही नेटकऱ्यांकडून केला जात आहे.गेल्या काही दिवसांपासून हृताच्या प्रोफेशनल हालचालींमध्ये तिच्या नवऱ्याचे नाव वारंवार घेतले जाते. नुकतंच या सर्व आरोपांवर हृताने मौन सोडत सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “मला मुळात ट्रोलिंग केलेले आवडत नाही. तुम्ही ज्या व्यक्तीवर भरभरुन प्रेम करता त्याच्याबद्दल एखादी गोष्ट वाचून, त्याचा पाठपुरावा न करता कसे काय व्यक्त होता?” असे हृताने म्हटले आहे.
“एखाद्याबद्दल सत्य माहिती नसताना एखाद्याला ट्रोल करणं हे अजिबात चांगलं नाही. काही दिवसांपूर्वी मन उडू उडू झालं ही मालिका बंद होणार असल्याचे समोर आले. त्यानंतर मी दादा एक गुडन्यूज आहे, हे नाटकही सोडत असल्याची माहिती चाहत्यांना मिळाली. यावर अनेकांनी मला ट्रोल केले. तसेच मला हे सर्व करण्यास प्रतीकने सांगितले, असा दावाही काहींनी केला”, असेही हृता म्हणाली.
Timepass 3 Trailer : दगडू- पालवीची गोष्ट झकास, पुन्हा एकदा होणार फुल्ल ‘टाइमपास’
“पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की, प्रतीक हा माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा व्यक्ती आहे. पण म्हणून तो माझे निर्णय घेत नाही. गेल्या दहा वर्षांपासून मी माझं करिअर घडवलं आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या कमेंट करताना थोडासा विचार करा. मला माझा चाहतावर्ग असंवेदनशील असावा असे अजिबात वाटत नाही”, असेही तिने सांगितले.
दरम्यान हृता दुर्गुळे लवकरच प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. येत्या २२ जुलैला प्रताप फड दिग्दर्शित ‘अनन्या’ हा चित्रपट प्रदर्शित होणरा आहे. यात हृता ही प्रमुख भूमिकेत असणार आहे. त्यासोबत हृता ही लवकरच टाइमपास ३ या चित्रपटाही झळकणार आहे. हा चित्रपट येत्या २९ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.