अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती अशी ओळख असलेल्या मनवा नाईकबरोबर एका कॅब चालकाने गैरवर्तन केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले होते. याप्रकरणी तिने स्वत: पोस्ट शेअर करत माहिती दिली होती. या प्रकरणानंतर अवघ्या २४ तासांच्या आत मुंबई पोलिसांनी तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या कॅब चालकाला अटक केली आहे. तसेच त्याची गाडीही जप्त करण्यात आली आहे. या सर्व धक्कादायक प्रकारानंतर मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मनवाच्या पोस्टवर कमेंट केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनवाने तिच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. पोस्ट शेअर करत तिने तिच्याबरोबर घडलेल्या धक्कादायक प्रसंगाबद्दल सांगितले होते. यात तिने तिच्याबरोबर एका कॅब चालकाने गैरवर्तन केले याबद्दल सविस्तर भाष्य केले आहे. तिने ही पोस्ट ट्वीटरवरही शेअर केली असून यात तिने मुंबई पोलिसांना टॅग केले होते. यानंतर मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. “मनवा जी… आम्ही या घटनेची दखल घेतली आहे. Dcp झोन ८ यावर काम करत आहे. या चालकावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात येईल”, असे विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटले होते.
आणखी वाचा : “आधी धमकावले, नंतर अंधारात गाडी उभी केली आणि…” उबरमध्ये अभिनेत्री मनवा नाईकबरोबर घडला धक्कादायक प्रसंग

त्यावर एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत मनवा म्हणाली, “विश्वास नांगरे पाटील हे नेहमीच माझ्या मदतीला धावून आले आहेत. मी काल ट्वीट केल्यानंतर लगेचच मला मुंबई पोलिसांचा फोन आला. त्यांनी माझी चौकशी केली. त्यानंतर लगेचच उबर चालकावर कारवाईदेखील केली. मुंबई पोलीस हे खूप सक्रिय आहेत. तसेच हे शहरदेखील खूप सुरक्षित आहे.”

“माझ्यासोबत काल घडलेली घटना फार क्वचित घडते. पण अशी घटना घडायला नको यासाठी नागरिक म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे. आयुष्यात कधीतरी अशी एखादी घटना घडते. अशावेळी त्या गोष्टीचा सामना करणं गरजेचं आहे. मुंबई शहरात रात्री- मध्यरात्री अनेक मुलींना-महिलांना घराबाहेर पडावं लागतं. त्यामुळे मुलींनी सतर्क राहणं गरजेचं आहे. तसेच ओला-उबरसारख्या अॅपने नोकरीसाठी चालकांची निवड करताना त्यांचा योग्य तो पाठपुरावा करायला हवा. त्यांची वैयक्तिक माहिती तपासून घ्यायला हवी. त्याबरोबर नागरिक म्हणून आपणही जबाबदारीने वागलं पाहिजे. म्हणजे एखादी उबर बुक करताना त्याचा जो चालक आहे. तो आपल्या अॅपवरचा चेहरा आहे का हे बघायला हवं. तसेच प्रवासादरम्यान लाईव्ह लोकेशन कुटुंबियांसोबत शेअर करावं”, असेही मनवा नाईकने म्हटले.

मनवा नाईकशी गैरवर्तन करणाऱ्या कॅब चालकाला अटक

दरम्यान मनवा नाईकने फेसबुकवर पोस्ट शेअर केल्यानंतर वांद्र कुर्ला संकुल परिसरातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत पोलिसांनी त्या कॅब चालकाचा शोध घेतला असून त्याला अटक केली आहे. मोहम्मद मुराद आझम अली असे या कॅब चालकाचे नाव आहे. तो २४ वर्षांचा असून अँटॉप हिल परिसरात राहणारा रहिवाशी आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर त्याची गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे.
आणखी वाचा : अभिनेत्री मनवा नाईकशी गैरवर्तन करणं कॅब चालकाला भोवले, २४ तासांच्या आत पोलिसांकडून बेड्या

त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ आणि ५०६ या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहन चालवताना फोनवर बोलणे आणि सिग्नल जंप केल्याबद्दल मोटार वाहन कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल संध्याकाळच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली असून आज सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress manava naik first reaction after threatened misbehaved by cab driver arrested nrp