Sonali Kulkarni Video : लोकप्रिय मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या मनमोहक सौंदर्याने आणि उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकणारी सोनाली तिच्या नृत्यानेही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते. आज सोनालीचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे, पण तुम्हाला माहीत आहे का? सोनालीसुद्धा एका लोकप्रिय अभिनेत्रीची खूप मोठी चाहती आहे आणि ही अभिनेत्री म्हणजे काजोल.
सोनाली कुलकर्णी ही काजोलची खूप मोठी चाहती असून लहानपणापासून तिला फॉलो करत आली आहे. काजोलच्या गाण्यांवर सोनाली लहानपणापासून थिरकत आली आहे. त्यामुळे तिला भेटण्याची सोनालीची इच्छा होती आणि ती इच्छा नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य पुरस्कार सोहळ्यात पूर्ण झाली. या इच्छापूर्तीचा आनंद सोनालीने सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला आहे.
सोनालीने मंगळवार, ५ ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या महाराष्ट्र राज्य पुरस्कार सोहळ्यात काजोलच्या काही लोकप्रिय गाण्यांवर नृत्यसादरीकरण केलं. यानंतर काजोलने सोनालीला मिठी मारत दाद दिली. या सगळ्यामुळे सोनाली भारावून गेली असून, हा आनंद तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे व्यक्त केला आहे.
या पोस्टमध्ये सोनाली असं म्हणते, “काजोलची मी अगदी लहानपणापासूनच मोठी चाहती आहे. ‘मेरे ख्वाबों में जो आए’सारख्या तिच्या सगळ्या गाण्यांवर आरश्यासमोर थिरकत राहिलीये. अशातच महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार सोहळ्यात तिच्या समोर, तिच्यासाठी सादरीकरण करण्याची संधी मिळाली. ही इतकी कमाल गोष्ट आहे की, ती खरं तर मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. तिच्या निखळ अभिनयाने, स्वच्छंदी स्वभावाने, तसंच ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन असलेल्या जिवंतपणाने, बिनधास्तपणे जगण्याच्या वृत्तीने, निरागसपणाने कायमच मला भुरळ घातली आहे.”
यापुढे सोनाली म्हणते, “माझ्या सादरीकरणानंतर मिळालेल्या तिच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मी काय म्हणावे… एका सच्च्या कलाकाराने एका कलाकाराचे असे कौतुक करावे. हे एका उत्तम माणसाचे आणि रसिक असण्याचे चिन्ह. ती मिठी आणि तिचे कौतुकाचे शब्द कायम स्मरणात राहतील. या आधी श्रीदेवी आणि लता मंगेशकर यांना मानवंदना वाचण्याची संधी मिळाली होती; पण त्या नसताना… पण यावेळी काजोलच्या वाढदिवशी, तिच्या गाण्यांवर, तिच्या समोर प्रत्यक्ष नाचता येणं ही एका प्रामाणिक चाहतीकडून या तिच्या सुपरस्टारला छोटीशी भेट आहे.”
सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम पोस्ट
दरम्यान, ‘महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार’ सोहळा मंगळवार, ५ ऑगस्ट रोजी मुंबईत थाटामाटात पार पडला. यावेळी अभिनेत्री काजोल देवगणला राजकपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. काजोलसाठी हा पुरस्कार दुहेरी आनंद देणारा होता; कारण, ५ ऑगस्ट रोजी अभिनेत्रीचा वाढदिवसही होता. पुरस्कार स्वीकारताना काजोलसमोर तिची आई म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री तनुजादेखील उपस्थित होत्या.