“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी” या ओळी प्रत्येक मराठी माणसाच्या ओठावर रुळल्या आहेत. मराठी ही फक्त भाषा नसून जीवन पद्धती झाली आहे. या भाषेला एक अमुल्य वारसा आहे. अशा या वैभवशाली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शासन पुर्णपणे प्रयत्नशील असून मराठीचा प्रसार, प्रचार वृद्धींगत करण्यासाठी प्रत्येक मराठी मन झगडतंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. मराठी ही अभिजात भाषा आहे आणि तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळायालाच हवा, यासाठी झी मराठी वाहिनी ‘गर्जतो मराठी’ हा विशेष कार्यक्रम २७ फेब्रुवारी रोजी सादर करणार आहे. या २ तासाच्या विशेष सांगीतिक कार्यक्रमात नृत्य, सदाबहार मराठी कविता आणि गाणी यांचा त्रिवेणी संगम प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

इतकंच नव्हे तर या कार्यक्रमातून मराठी साहित्याचं दर्शन प्रेक्षकांना घडेल. ‘अभिजात मराठी जनाभियान’ला पाठिंबा दर्शवण्यासाठी हा कार्यक्रम झी मराठी वाहिनी सादर करत असून या अभियानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी कौशल इनामदार यांनी ‘अभिजात मराठी गौरव गीत’ याची रचना केली आहे जे प्रेक्षकांना या विशेष कार्यक्रमात पाहायला मिळेल.

या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेत्री गिरीजा ओक आणि हृषीकेश जोशी करणार असून स्पृहा जोशी, संदीप पाठक, किशोर कदम, विभावरी देशपांडे आणि चंद्रकांत काळे यांच्याकडून प्रेक्षकांना दर्जेदार कविता ऐकायला मिळतील. तसेच मंगेश बोरगावकर, हृषीकेश रानडे, केतकी भावे आणि धनश्री देशपांडे यांच्याकडून सदाबहार गाणी आणि मयुरेश पेम, धनश्री काडगावकर, शुभंकर तावडे आणि केतकी पालव या कलाकारांचा नृत्याविष्कार प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi bhasa diwas special program on zee marathi