Bhagyashree Mote New Home in Mumbai : अभिनेत्री भाग्यश्री मोटे मागील अनेक वर्षांपासून मराठी सिनेसृष्टीत सक्रिय आहे. जवळपास १४ वर्षांपासून कामानिमित्त मुंबईला ये-जा करणाऱ्या भाग्यश्रीने आता स्वप्ननगरीत हक्काचं घर घेतलं आहे. भाग्यश्रीने इन्स्टाग्रामवर गृहप्रवेशाचे फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी दिली.

मुंबईत आपलं हक्काचं घर असावं हे भाग्यश्री मोटेचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. पुण्याच्या भाग्यश्रीने मुंबईत नवीन घर घेतलं आहे. या घरात तिने कुटुंबियांबरोबर गृहप्रवेश केला. तिने घराचे सुंदर फोटो पोस्ट केल्यावर स्वप्नील जोशीसह अनेक कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

“स्वप्नपूर्ती.
सुमारे १४ वर्षांपूर्वी मी मुंबईत येणं-जाणं सुरू केलं. त्यावेळी राहायला जागा नसल्याने एका दिवसात येऊन, ऑडिशन्स देऊन, भेटीगाठी करून पुण्याला परत जावं लागायचं. आणि आजचा दिवस… या स्वप्ननगरीत माझं हक्काचं घर झालंय. बाळ तू हवी होतीस, तुझी खूप आठवण येतीये, तुझ्या इतकं आनंदी आज दुसरं कोणी नसतं आणि तो आनंद बघण्याचं नशीब मला लाभलं असतं. असो. असशील तिथे तू खूप खूश राहा. आणि माझा अभिमान बाळगत असशील हे तर मला माहितीच आहे. खूप कृतज्ञ आहे, सगळ्यांनी इतकं प्रेम दिलं, साथ दिली. खूप खूप धन्यवाद आणि आभार. माझ्यावरचं प्रेम आणि समर्थन असंच राहू द्या!”, असं कॅप्शन भाग्यश्री मोटेने या फोटोंना दिलं आहे.

पाहा पोस्ट

स्वप्नील जोशीने भाग्यश्रीच्या पोस्टवर गॉड ब्लेस यू, अशी कमेंट केली आहे. तर ऋतुजा बागवेने तिचं अभिनंदन केलं आहे. अक्षया हिंदळकर, सावनी रविंद्र, आदित्य सरपोतदार यांनी कमेंट्स करून भाग्यश्रीचं नवीन घरासाठी अभिनंदन केलं आहे. त्याचबरोबर चाहत्यांनीही तिच्या या पोस्टवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

भाग्यश्री मोटे ‘माझ्या बायकोचा प्रियकर’, ‘पाटील’, ‘एकदम कडक’, ‘काय रे रास्कला’, ‘भवाई’, ‘मुंबई मिरर’ या कलाकृतींसाठी ओळखली जाते.