हेमंत ढोमे(Hemant Dhome) दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमेय वाघ(Amey Wagh), क्षिती जोग व सिद्धार्थ चांदेकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. कलाकार म्हणून एकत्र काम करत असतानाच हेमंत ढोमे व अमेय वाघ हे खूप चांगले मित्रही आहेत. मात्र, काही वर्षांपूर्वी अमेय वाघ व हेमंत ढोमे यांच्यामध्ये वाद झाला होता, त्यांच्यात अबोला होता. तो अबोला का होता, ते परत कधी बोलायला लागले याबद्दल त्यांनी मुलाखतीत वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

असा विचार मी अनेक वर्ष…

अमेय वाघ व हेमंत ढोमे यांनी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनेलवर दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी अमेयने हेमंतला म्हटले, “इतकी वर्षे मध्ये लोटली. आपला काही संपर्कच नव्हता. तर या इतक्या वर्षात तुला माझी कधी आठवण झाली का? तुला असं वाटलं का की याच्याशी आपण बोलावं? संपर्क करावा किंवा असं काही तुझ्या आयुष्यात झालं का की तुला वाटलं की आता अम्या असता तर बरं झालं असतं?” यावर बोलताना हेमंत ढोमेने म्हटले, “मधल्या काळात आपले काही खटके उडाले. ज्यामध्ये आपला थेट सहभाग नव्हता. तर त्यावेळी मला असं झालं की अमेयने माझी बाजू का घेतली नाही. भलेही भांडण झालं असेल, मी चूक किंवा बरोबर असेन, पण त्याने बसून असं का बोललं नाही की त्याचं अमुक अमुक गोष्टी चुकल्या असतील, तुमचं हे चुकलं असेल; पुढे जाऊयात. मला असं वाटलं की, अमेय हे कदाचित करू शकत होता. पण, त्याने हे का केलं नाही असा विचार मी अनेक वर्ष करत होतो.”

“साधारण २०११ ला मी आणि क्षिती भेटलो. तिथून माझ्या डोक्यातील घोळ जरा कमी व्हायला सुरुवात झाली. माझ्या आयुष्यातही खूप भयानक घटना घडल्या होत्या. मी एक सिनेमा केला, सिनेमाच्या शूटिंगदरम्यान एक नाटक करत होतो. त्या नाटकाच्या प्रयोगाला पोहोचू शकलो नाही, मग बदनामी झाली. नवा गडी बिघडला अशा टायटलच्या बातम्या आल्या. त्या काळात असं सगळं खूप झालं. हे सगळं मी २००९-१० ची गोष्ट सांगतोय आणि तेव्हा असं झालेलं की आपलं काय चाललंय? कामावरून खटका उडाला आणि मित्र तुटले. यामध्ये थेट माझा काही सहभाग नव्हता; म्हणजे मी असं केलं म्हणून असं घडलं. तेव्हा मला तुझी आठवण आली, नाही अशातला भाग नाही. निपुणही होता, तूही होतास. आपल्या तिघांबद्दल बोलायचं तर मला त्याच्यापेक्षा तुझी आठवण जास्त आली, कारण आपण एका वेगळ्या लेव्हलला जास्त कनेक्टेड होतो. आपण ज्या पार्श्वभूमीतून आलो, ज्या कुटुंबातून आलो, आपले आई-बाबा खूपच शिक्षित वैगेरे असं काही नव्हतं. त्यांचं त्यांनी जे जमवून आपल्याला वाढवलंय ते वाढवलंय. त्यामुळे तेव्हा मला असं वाटायचं की त्याला कळेल आपल्याला आता काय वाटतंय, तर तेव्हा आपण बोलतच नव्हतो. क्षिती जेव्हा भेटली ना, तर तिच्याशी बोलल्यानंतर ती म्हटली होती की तुम्ही बालिश आहात. आपलं वयच होतं, एकमेकांबद्दल वाईट मनात काही नव्हतं. आपलं वय हीच समस्या होती.”

यावर अधिक बोलताना अमेय वाघने म्हटले की, क्षितीबरोबर जेव्हा माझी मैत्री झाली, त्यानंतर आमच्यात यावर बोलणं झाल्यावर मला याची जाणीव झाली की पुढं गेलं पाहिजे. त्याला खूप वर्षे झाली, ते मागे सोडलं पाहिजे.

पुढे अमेयने हेमंतला विचारले की, तुला तो प्रसंग आठवतोय का, ज्यामुळे आपण परत बोलायला लागलो? यावर बोलताना हेमंतने म्हटले, “मला तुझ्याबाबतीत टाइम लाइन आठवत नाही. तू आणि मी बोलायचं थांबलो तो क्षण मला आठवत नाही.” त्यावर अमेयने म्हटले, “तू मुरांबा चित्रपटाच्या प्रीमिअरला आला होतास आणि थेट मिठी मारली होतीस. अम्या काय काम केलंस आणि छान वाटलं. मला अभिमान वाटतोय तुझा, असं तू म्हटलं होतंस. त्यानंतर आपलं दुसऱ्या दिवशी फोनवर बोलणं झालं. मग आपण बोलायला सुरुवात केली.”

दरम्यान, ‘फसक्लास दाभाडे’ हा चित्रपट २४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. भावंडांवर आधारित हा चित्रपट आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amey wagh and hemant dhome revelas they did not speak to each other for many years work together upcoming movie fussclass dabhade nsp