Ashok Saraf : ज्येष्ठ मराठी अभिनेते महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांना नुकताच पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पद्म पुरस्कारांची घोषणा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आली. या यादीत अशोक सराफ यांच्यासह महाराष्ट्रातील इतरही महत्त्वाची नावं आहेत. विनोदाचं अचूक टायमिंग साधत गेली वर्षानुवर्षे त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मराठी मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या मराठी कलाविश्वातून अभिनेत्यांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. अशोक सराफ यांचं कौतुक करण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी पोस्ट देखील शेअर केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशोक सराफ यांना पद्मश्री जाहीर झाल्यावर त्यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा आनंद सुद्धा गगनात मावेनासा झाला आहे. ‘एबीपी माझा’शी संवाद साधताना अशोक सराफ यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणाल्या, “मला खरंच खूप आनंद झाला आहे. मी खूप आभारी आहे. हा एकट्या अशोकचा सन्मान नाहीये, हा महाराष्ट्रातील प्रत्येक प्रेक्षकाचा सन्मान आहे. कारण, त्यांनी नेहमी अशोकवर प्रेम केलं. त्यांच्या अभिनयावर प्रेम केलं. त्यांची जी अविरत मेहनत आहे… इतक्या वर्षांची त्याचं सार्थक झालं. अशोकने केवळ एकाग्रतेने अभिनय एके अभिनयच केला. त्या सगळ्याची ही पोचपावती आहे. मी प्रेक्षकांची खूप ऋणी आहे, महाराष्ट्राच्या जनतेची आणि केंद्र सरकारची कारण, ही आम्हा कुटुंबीयांसाठी खूपच आनंदाची बाब आहे.”

निवेदिता सराफ म्हणाल्या, “अशोकने त्यांच्या सगळ्या प्रेक्षकांना नेहमी देवासमान मानलंय. त्यांना कामापुढे कधीच काही दिसलं नाही, कधी पैसे कमावणं हे देखील उद्दिष्ट नव्हतं. मी जगात काहीही करू शकतो पण, माझ्या प्रेक्षकांना मी कधीच फसवू शकत नाही. असं ते नेहमी म्हणायचे. त्यामुळे एवढी वर्षे त्यांनी केवळ प्रामाणिकपणे आपलं काम केलं. भूमिका छोटी असो, मोठी असो त्यांनी नेहमी प्रामाणिकपणाने सर्व केलं. महाराष्ट्र भूषण आमच्यासाठी विशेष आहेच आणि आता त्यांना पद्मश्री मिळाला आहे, म्हणून मी खरंच खूप आनंदी आहे.”

“आम्हाला हा सन्मान महाराष्ट्रातील लोकांना समर्पित करायचा आहे आणि अर्थातच, त्यांच्या कारकिर्दीला आकार देण्यात भूमिका बजावणाऱ्या सर्व दिग्दर्शक, लेखक आणि सह-कलाकारांना हा पुरस्कार आम्ही समर्पित करतो” अशी प्रतिक्रिया निवेदिता सराफ यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok saraf conferred with padma shri wife nivedita express gratitude shares her first reaction sva 00