मराठीसह हिंदी आणि अनेक इतर भाषांमध्ये काम करणारे बहुआयामी अभिनेते म्हणजे अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) होय. अतुल कुलकर्णींनी आतापर्यंत वेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘हे राम’, ‘बम बम बोले’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘७०६’, ‘चांदनी बार’, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’, ‘नटरंग’ अशा अनेक चित्रपट, वेब सीरिजमधून अतुल कुलकर्णींनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता एका मुलाखतीत १० वर्षांपासून मराठी सिनेमांपासून दूर का आहे, याबाबत त्यांनी खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी सिनेमांपासून लांब का?

अतुल कुलकर्णींनी नुकतीच अमोल परचुरेंच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना सांगितले की, १० वर्षे झाली मराठी सिनेमा केलेला नाही. मराठी सिनेमांपासून लांब का आहे, या प्रश्नाचे उत्तर देताना अतुल कुलकर्णी यांनी सांगितले, “मी लांब राहतोय, असं काही जाणूनबुजून करत नाहीये. तशी स्क्रिप्ट आली नाही, तशी संधी आली नाही, हे त्याचं बेसिक होतं. एक ऑफर आली होती; पण ती माझ्या हातातून गेली.”

“‘मानवत मर्डर’साठी मला आदिनाथ आणि आशीष बेंडे यांनी मला फोन केला होता. मला ती कल्पना खूपच आवडली होती. त्या भूमिकेसाठी मी खूपच उत्सुक होतो. खूप दिवसांत मराठीत काही करण्याची संधी मिळाली नाहीये आणि हे आलंय आपल्यापर्यंत, त्यामुळे माझी उत्सुकता खूप होती. त्यादरम्यान सिनेमा करत होतो. मग मी त्यांना म्हटलं की, तो जरासा ढकलण्याचा प्रयत्न करतो. कसं होतं नटाचं तुम्हाला असं आवडणारं एकदा सांगितलं ना कोणी, की अरे हे तुला ऑफर करतोय की, मेंदूतली जागा त्याच्यासाठी आपोआप रिझर्व्ह होते आणि तुम्ही बाकी काही करत असाल, तर तुम्ही काहीतरी विचार करता, बोलता, वाचता, असं सगळं -मी त्या फेजमध्ये होतो. त्यानंतर काही दिवस गेले. माझ्या मॅनेजरचं बोलणं चालू होतं. माझे मेकअप आर्टिस्ट आहेत, त्यांच्याबरोबर मी बोलत होतो की, लूक असा ठेवू वगैरे. तर तो म्हणाला की, सर नाही ते आशुतोष गोवारीकर करत आहेत. मग मी माझ्या मॅनेजरला फोन केला आणि म्हटलं की विचार काय झालं? तिने फोन केला आणि म्हणाली, हो, आशुतोष गोवारीकर करत आहेत.”

“मला वाईट वाटले. मी तेवढा बरा नट नसेन हा भाग मी अगदीच मान्य करतो. मी त्या भूमिकेला सूट होत नाही, असं असू शकतं. मला का वाईट वाटलं याचं मुख्य कारण असं होतं की, मला या दोघांकडूनही कळलं नाही की, मी ती भूमिका करत नाहीये. मला कुठून तरी बाहेरून मी विचारल्यानंतर कळलं, याचं मला खूप वाईट वाटलं. आजही मला असं वाटतं की, अरे यार मला सांगायला हवं होतं; जेणेकरून हा मुद्दा हातातून गेल्याचा नाहीये. कारण- तुम्ही त्यामध्ये काहीतरी गुंतवणूक करता आणि ते असं कुठून तरी बाहेरून कळल्यानंतर वाईट वाटतं.”

याबद्दल पुढे बोलताना अतुल कुलकर्णींनी हसत म्हटले, “मग मी त्याचा राग आशुतोषवरच काढला. मधे आम्ही आमिरकडेच भेटलो. त्याला म्हटलं की, आता आम्ही दिग्दर्शकाबरोबर स्पर्धा करायची, हे काय आहे? तर त्यावर तो म्हटला की, लेखकांनी नाही का तुझ्याबरोबर लाल सिंह चड्ढाची गोष्ट लिहिताना स्पर्धा केली. म्हटलं तसं नाही. मला सुचलं आणि मी लिहिलं. इथे मला कोणीतरी दुसऱ्यांनी विचारलं होतं वगैरे”, असे म्हणत मराठी ही माझी मातृभाषा आहे. मला नक्कीच मराठीमध्ये काम करायला आवडेल, असेही अतुल कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: Video: “या नात्याचा प्रवास एवढ्यापर्यंतच…”, अखेर शिवा व आशू एकमेकांपासून कायमचे वेगळे होणार; मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो

अतुल कुलकर्णींच्या कामाबद्दल बोलायचे तर, ते नुकतेच ‘बंदीश बॅन्डिट्स’ (Bandish Bandits)च्या दुसऱ्या पर्वातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. १२ डिसेंबरला ही वेब सीरिज अ‍ॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. त्यामध्ये अतुल कुलकर्णी शास्त्रीय गायकाची भूमिका साकारताना दिसत आहेत. आता ते कोणत्या मराठी सिनेमा, वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atul kulkarni on why he away from marathi films for 10 years reveals reason nsp