Better Half Chi Love Story Trailer : आगामी मराठी चित्रपट ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. प्रेम, भूत आणि हास्याचा भन्नाट मेळ घालणारा हा ट्रेलर आहे. सुबोध भावे आणि रिंकू राजगुरू ही हटके जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘पालतू फालतू’ या मजेशीर गाण्यामुळे आणि ‘ना कळले कधी तुला’ या भावनिक गाण्यानंतर अखेर ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’च्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना या प्रेमकथेच्या गोंधळातल्या धमाल प्रवासाची झलक पाहायला मिळाली आहे. सुबोध भावे याची ‘बेटर-हाफ’ म्हणजे पत्नी गेल्यानंतर तिचा आत्मा त्याच्याच शरीरात असल्याचं गोंधळलेलं चित्र ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं. त्यातून सुटका मिळवण्यासाठी सुरू होतो विनोदी संघर्ष, ज्यात प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव यांची त्याला साथ मिळते. आता यातून सुबोध भावाची सुटका होते का, याचे उत्तर मात्र प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे.

पाहा ट्रेलर

दिग्दर्शक संजय अमर या चित्रपटाविषयी म्हणाले, “ही घोस्ट कॉमेडी असली तरी ती एका आगळ्यावेगळ्या प्रेमकथेची सांगड घालते. कलाकारांच्या ताकदीमुळे ही संकल्पना पडद्यावर प्रभावीपणे साकारता आली. सुबोध आणि रिंकूची फ्रेश जोडी, प्रार्थना आणि अनिकेतसारखे अनुभवी कलाकार यांचं योगदान अमूल्य आहे.”

‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटाचे लेखन, छायांकन आणि दिग्दर्शन संजय अमर यांचेच असून, साजन पटेल आणि अमेय नरे यांनी संगीताची जबाबदारी सांभाळली आहे. सुबोध भावे, रिंकू राजगुरू, प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्यासारख्या दमदार कलाकारांच्या अभिनयाने साकारलेला हा सिनेमा येत्या २२ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.