Mrunal Thakur Praises Dashavatar Movie : १२ सप्टेंबर रोजी आलेल्या ‘दशावतार’ या सिनेमानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. कोकणातल्या बाबुली मेस्त्रीची ही गोष्ट रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरातील प्रेक्षकांना हा ‘दशावतार’चा खेळ आवडलाय. सुबोध खानोलकर लिखित व दिग्दर्शित या सिनेमात दिलीप प्रभावळकर हे मुख्य भूमिकेत आहेत. वडील-मुलाच्या प्रेमळ नात्याबरोबरच कोकणातील पारंपरिक लोककलाही या सिनेमातून पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्र आणि जगभरात गाजलेल्या ‘दशावतार’चं सध्या सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह राजकीय क्षेत्रातल्या आणि कलाविश्वातल्या मान्यवर मंडळींनी या सिनेमाचं कौतुक केलं आहे. ‘कांतारा’चा दिग्दर्शक ऋषभ शेट्टीनंदेखील ‘दशावतार’बद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली होती. अशातच आता बॉलीवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरनंही ‘दशावतार’बद्दल प्रतिक्रिया व्यक्त करीत दिलीप प्रभावळकर आणि सिनेमाच्या टीमचं कौतुक केलं आहे.

मृणाल म्हणाली, ” ‘दशावतार’ हा अप्रतिम सिनेमा पाहिला आणि मला इतकं बरं वाटतंय की, इतक्या दिवसांनी, नव्हे वर्षांनी, मला सिनेमात मराठी संस्कृती आणि आपलं कोकण पाहायला मिळालं. कुडाळमध्ये हा सिनेमा शूट झाला आहे. सुबोध खानोलकरचा (दिग्दर्शक) हा पहिलाच सिनेमा आहे, असं अजिबात वाटलं नाही. ‘दशावतार’मध्ये दाखवण्यात आलेले सगळे अवतार हे आज आपल्या आजूबाजूला जे जे काही चालू आहे, त्या परिस्थितीत दाखवणं खूप गरजेचं होतं. आजूबाजूच्या परिस्थितीवर कलाकृतीतून मनोरंजनाद्वारे भूमिका मांडणं गरजेचं आहे. या सिनेमातून खूप काही शिकण्यासारखं आहे. या अशा सिनेमांमधून येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला काही करता येईल का? जर करता आलं, तर ते केलं पाहिजे.”

झी स्टुडिओनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओत पुढे मृणाल म्हणते की, दिलीप प्रभावळकरांचं करावं तितकं कौतुक कमी आहे. ते एक महान कलाकार आहेत. दिलीपकाका, तुम्ही पडद्यावर जणू काही जादूच करता आणि हे कोणी करू शकत नाही. मल्याळम इंडस्ट्रीतही या सिनेमाचं खूप कौतुक होत आहे. अनेक मल्याळम प्रेक्षक ‘दशावतार’चं कौतुक करीत आहेत. सिनेमातले अनेक सीन, लोकेशन्स, सिनेमाची गाणी, नृत्य, दिग्दर्शन अशा अनेक गोष्टी या सिनेमात आहेत. मला काही गोष्टी माहीत नव्हत्या, त्या या सिनेमामुळे मला कळल्या. संपूर्ण ‘दशावतार’ सिनेमाच्या टीमचं अभिनंदन आणि शुभेच्छा!”

मृणाल ठाकूरनं केलं दशावतार सिनेमाचं कौतुक

दरम्यान, ‘दशावतार’नं भाषेच्या सीमा ओलांडून देशभरातल्या अनेक अमराठी रसिकांचंही मनोरंजन केलं. अमेरिकेपासून ते ऑस्ट्रेलिया, जपान आणि जर्मनी, नॅार्वेपर्यंत सगळीकडे या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्व स्तरांतून सिनेमाचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं. ‘दशावतार’बद्दल इतर भाषक प्रेक्षकांमध्येही मोठं कुतूहल निर्माण झालं आणि त्यामुळेच केरळमधील प्रेक्षकांच्या आग्रहाखातर हा सिनेमा मल्याळी भाषेतूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २१ नोव्हेंबर रोजी ‘दशावतार’ केरळमध्ये प्रदर्शित होणार आहे.