Chhaya Kadam Shared a Video : छाया कदम मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. छाया कदम हल्ली सोशल मीडियावर विशेष सक्रिय असतात. अनेकदा त्या यामार्फत त्यांच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी शेअर करतात. अशातच आता त्यांनी एक नवीन पोस्ट केली आहे. यामधून त्यांनी त्यांचा परदेशातील एक व्हिडीओ शेअर केला आहे.
छाया कदम यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, यामध्ये त्यांनी पॅरिसमध्ये असताना पहिल्यांदाच एक नवीन गोष्ट केल्याचं म्हटलं आहे. या पोस्टला त्यांनी कॅप्शन देत त्याबाबत सांगितलं आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या आयफेल टॉवरसमोर बसून हॉट चॉकलेट पिताना दिसत आहेत.
यामधून त्यांनी पहिल्यांदाच हॉट चॉकलेटचा आस्वाद घेतल्याचं सांगितलं आहे. छाया यांनी या व्हिडीओला “Eiffel Tower समोर बसून आयुष्यातली पहिलीच Hot Chocolate पिण्याची फिलिंग भलतीच claasy होती”, असं कॅप्शन दिलं आहे. यावेळी त्यांनी पॅरिसमध्ये असतानाचा त्यांचा हा आयफेल टॉवर समोरील व्हिडीओ शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
छाया कदम सोशल मीडियावर अनेकदा त्यांचे हटके लूक असलेले फोटो शेअर करत असतात. अभिनेत्री ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या त्यांच्या चित्रपटाच्या निमित्ताने २०२४ मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी कान्स येथे गेल्या होत्या. तेव्हा त्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आल्या होत्या. त्यावेळी अनेकांनी छाया यांचं कौतुक केलं होतं.
दरम्यान, छाया कदम यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर त्यांच्या अभिनयाची छाप पाडली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी, ‘लापता लेडिज’, ‘जवान’, ‘मडगाव एक्स्प्रेस’, ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ यांसारख्या चित्रपटांतून काम करत प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. छाया कदम यांनी यापूर्वी ‘झूंड’, ‘कौन प्रवीण तांबे’, ‘सोयरीक’, ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘अंतिम’, ‘सरला एक कोटी’ यांसारख्या चित्रपटांतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.