Chhaya Kadam Shares Emotional Post : यंदाच्या ७० व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात मराठी अभिनेत्री छाया कदम यांना ‘लापता लेडीज’मधील मंजू माई या भूमिकेसाठी फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला. या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातील काही खास क्षण त्यांनी शेअर केले आहेत. तसंच पुरस्कार स्वीकारल्यानंतरच्या आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.
या पोस्टमध्ये छाया कदम म्हणतात, “यंदाच्या फिल्मफेअरच्या भरलेल्या आलिशान जत्रेने माझ्यातील कलाकारात असलेल्या एका लहान लेकराला जणू आकाशपाळण्यात बसून आभाळाला हात लावण्याचा आनंदच दिला. मंजूमाई म्हणजे आपल्या माणूसपणाची अशिक्षित का असेना, पण स्वाभिमानाच्या स्वातंत्र्याची गोष्ट ठळक करीत, केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगावर छाप पाडलेली ‘लापता लेडीज’मधली मी साकारलेली भूमिका.”
पुढे त्या म्हणतात, “खरं तर मंजूमाई ही मी आजपर्यंत करीत आलेल्या सगळ्याच स्त्री भूमिकांच्या जडणघडणीतून उभी राहिलेली एक बलाढ्य अशी भूमिका होती. म्हणजे खरं तर किरण रावसारख्या कसबी दिग्दर्शिकेला माझ्यात दिसलेली मंजूमाई आणि तिनं माझ्यावर ठेवलेला विश्वास हेच कदाचित माझ्या आतापर्यंतच्या सगळ्या लहानशा प्रवासाचं प्रतिबिंबच असावं. यंदाच्या फिल्मफेअरच्या निमित्तानं सहायक अभिनेत्री म्हणून मला मिळालेलं अवॉर्ड हे केवळ माझ्या एकटीचं नाही, तर मंजूमाईसारख्या बनून वेगळी गोष्ट सांगणाऱ्या प्रत्येकीचं आहे.”
पुढे छाया कदम सांगतात, “फिल्मफेअर! प्रत्येक कलाकाराचं असलेलं एक अजरामर असं स्वप्नंच आणि ते स्वप्न माझंही होतंच. मीसुद्धा कलाकार म्हणून त्याच्या भुकेनं व्याकूळ झालेच होते आणि अखेर मंजूमाईनं माझं बोट धरून मला तिथपर्यंत आणून सोडलंच. त्यानंतर मग जे काही माझ्याबरोबर घडलं, ते सगळं जादुई होतं. ‘मन्नत’ घडवणाऱ्या शाहरुख खानच्या हातांनी मला मिठीत घेत – माथ्यावर दिलेलं चुंबन म्हणजे माझ्यासाठी त्यानं दिलेली दुवाच आहे. हा प्रवासच सगळा थक्क करणारा आहे. किरण रावनं मला मंजूमाई दिली – मी मंजूमाईला छाया कदम दिली – मग मंजूमाईनं मला फिल्मफेअरची काळी बाहुली दिली – त्या काळ्या बाहुलीनं मला शाहरुख खान दिला – आणि शाहरुख खाननं मला दुवा दिली. सगळंच कसलं स्वप्नवत, पण कमाल.”
पुढे छाया कदम यांनी म्हटलंय. “या सगळ्याच सोबत आनंद याही गोष्टीचा झाला की, मला मिळालेला फिल्मफेअर हा माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला तो आपल्यालाच मिळाला आहे याचा होणारा आनंद. त्या सगळ्यांना खूप खूप प्रेम. पण, या सगळ्यात विशेष कौतुक मला त्याही सगळ्यांचं आहे; ज्यांनी माझ्या चेहऱ्यावर आपल्या हातांनी मंजूमाई रंगवली – माझ्या अंगावर मंजूमाई नेसवली – माझ्या केसांत मंजूमाई माळली. त्या सगळ्यांशिवाय मंजूमाई अर्धवटच राहिली असती. त्या सगळ्यांचे खूप खूप आभार. बस्स! आता हा तुम्हा सगळ्यांसोबतचा प्रवास असाच पुढेही माझ्यातल्या छायाला मायेची सावली देत राहो.”
फिल्मफेअरच्या मंचावरील छाया कदम यांची भावुक प्रतिक्रिया
यासह छाया कदम व्हिडीओमध्ये म्हणतात, “सुरूवातीला अनेकदा विचार करायचे की आता माझं नाव घेतलं जाईल. प्रत्येकवेळी लोक खूप कौतुक करायचे; पण पुरस्कार मात्र धोका देऊन जायचे. यावेळी विचार केला की, पुरस्कार मिळो किंवा न मिळो चांगलं तयार होऊन जायचं. किरण राव धन्यवाद. माझ्यावर इतका विश्वास ठेवल्याबद्दल खूप प्रेम. माझ्यासारख्या मराठी मुलीला, तुम्ही युपीची मंजू माई केलीत. माझा माझ्यावरच विश्वास नव्हता की मी ही भूमिका करू शकेन. पण तुम्ही तो विश्वास दिलात. यापेक्षा जास्त बोलत नाही; कारण मला माहित आहे हे काढून टाकलं जातं. पुन्हा एकदा धन्यवाद आणि सगळ्यांना प्रेम.”