Dashavatar Goa Special Screening : सध्या मराठीत एका सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे, तो म्हणजे ‘दशावतार’. दिलीप प्रभावळकरांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा अनेकांच्या पसंतीस पडत आहे. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असणाऱ्या या चित्रपटाविषयी अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केल्या जात आहेत.

राजकीय मंडळींपासून कलाकलारांपर्यंत सगळेच या सिनेमाचे कौतुक करत आहेत. प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादामुळे महाराष्ट्रातील ठिकठिकाणी दशवतारचे शोज लावले जात आहेत. अशातच गोव्यात या सिनेमाचं विशेष स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं. तसंच या स्क्रीनिंगवेळी सिनेमातील कलाकारांचा सन्मानही करण्यात आला.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ‘दशावतार’ चित्रपटाचे खास स्क्रीनिंग आणि टीमचा सन्मान पणजीमध्ये आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्री, गोवा बीजेपी प्रदेश अध्यक्ष दामू नाईक आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देताना मुख्यमंत्री म्हणाले, “सिंधुदुर्ग, मालवण येथे मोठ्या प्रमाणात होणारा दशावतार गोव्यामध्येदेखील तितकाच लोकप्रिय आहे. मला आनंद आहे, या चित्रपटाच्या निमित्ताने ही कला जागतिक पातळीवर जात आहे.” यावेळी त्यांनी ज्येष्ठ कलाकार दिलीप प्रभावळकर यांचा सन्मान केला आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हा चित्रपट जावा, यासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमात चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. याबद्दल ते म्हणाले, “एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आमंत्रण द्यावं आणि आम्हाला इथे बोलावणं हा आमच्या चित्रपटाचा मोठा सन्मान आहे, आम्ही कुडाळ आणि गोव्याच्या सीमा परिसरातच चित्रीकरण केले आहे.”

दरम्यान, १२ सप्टेंबर, शुक्रवार रोजी प्रदर्शित झालेल्या ‘दशावतार’ने आतापर्यंत सात कोटींच्या जवळपास कमाई केली आहे. Sacnilk च्या वृत्तानुसार, सिनेमानं पहिल्या तीन दिवसांतच जगभरात ५.२२ कोटींचा गल्ला जमावला होता. त्यानंतर सोमवारी १.१ कोटी आणि मंगळवारी दीड कोटी इतकी कमाई केली आहे.

‘दशावतार’मध्ये दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, महेश मांजरेकर, रवी काळे, भरत जाधव, अभिनय बेर्डेसह अनेक कलाकार आहेत.