Dashavatar Marathi Movie : मराठी सिनेसृष्टीत सध्या ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या ‘दशावतार’ सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. १२ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने आतापर्यंत ९.४५ कोटींचा गल्ला जमावला आहे. यामध्ये अनेक दमदार कलाकारांची मांदियाळी आहे. विशेष म्हणजे वयाच्या ८१ व्या वर्षी दिलीप प्रभावळकरांनी साकारलेल्या बाबुली मेस्त्रीच्या भूमिकेचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात येत आहे.

दिलीप प्रभावळकरांनी नुकत्याच ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत ‘दशावतार’च्या शूटिंगचा अनुभव सांगितला आहे. अभिनेते सांगतात, “या सिनेमाचं शूटिंग सुरू होण्याआधी मला चिकुनगुनिया झाला होता. त्यावेळी डॉक्टरने मला सांगितलं होतं तुम्ही शूटिंग वगैरे करू नका. तेव्हा नाटकाचे प्रयोग सुद्धा सुरू होते. त्यामुळे डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला होता. शूटिंग सुरू करण्याआधी हाच एक आजारपणाचा अडसर होता. हळुहळू औषधं घेऊन मी बरा झालो आणि मग शूटिंगला सुरुवात झाली. मी सेटवर हजर झालो, त्यावेळी माझ्या मुलाचं काम करणारा सिद्धार्थ मेनन…त्याने माझा तळवा सुजलाय ते पाहिलं होतं. पण, हे सगळं असूनही मी अ‍ॅक्शन सीन वगैरे शूट केले. अनेक सीन अंडरवॉटर देखील शूट करण्यात आले होते.”

‘असं’ कोकण पहिल्यांदाच पाहिलं

“मी यापूर्वी ४-५ सिनेमांचं शूटिंग कोकणात केलं होतं. ‘नारबाची वाडी’, ‘विटी दांडू’, ‘मर्डर मेस्त्री’, ‘पंचक’ या सगळ्या सिनेमांचं शूटिंग कोकणात झालं होतं. पण, दशावतारच्या निमित्ताने मी जे कोकण पाहिलं खरं सांगतो मी असं कोकण कधीच पाहिलं नव्हतं. या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही प्रत्यक्ष कोकणातील जंगलात शूटिंग केलं होतं. अनेक सीन्स आम्ही रात्री शूट केलेत. माझी प्रमुख भूमिका असल्याने माझं शूटिंग ५० दिवस होतं. तर, ५० मधील २० ते २२ दिवस रात्रीचं शूटिंग होतं. संध्याकाळी ६ वाजल्यापासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत असं आमचं शूटिंग सुरू असायचं. अनेकदा मेकअप करायला सुद्धा मला २-२ तास सुद्धा लागायचे.” असं दिलीप प्रभावळकरांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा
Dashavatar Marathi Movie : दिलीप प्रभावळकरांनी सांगितला ‘दशावतार’च्या शूटिंगचा अनुभव, म्हणाले…

याशिवाय ‘एबीपी माझा’ दिलेल्या मुलाखतीत दिलीप प्रभावळकरांना वयोमानानुसार तुम्ही इतका वेळ शूटिंग, अ‍ॅक्शन सीन कसे केलेत असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर अभिनेते म्हणाले, “अर्थात अनेक सीन पळापळ, धावपळ करतानाचे होते. त्यामुळे थोडं शारीरिकरित्या हे सगळं शेड्युल दमवणारं होतं. जे काही सीन आम्ही पाण्यात शूट केले तेव्हा मी प्रत्यक्ष खाडीत, उथळ पाण्यात पोहलो आहे. लोक जेव्हा कौतुकाने आणि आदराने म्हणतात, ‘सर तुम्ही या वयात सुद्धा हे जबरदस्त सीन केलेत’ त्यावेळी माझी प्रतिक्रिया असते, ‘अरे हो ना’ चाहत्यांच्या या प्रतिक्रिया ऐकून मला जाणीव होते अरे माझं वय इतकं झालंय. पण, एक सांगायला आवडेल जेव्हा बाबुली मेस्त्री सारख्या भूमिका वाट्याला येतात तेव्हा आपल्याला एक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा आत्मविश्वास येतो. यामुळेच या वयात सुद्धा थकवणारी भूमिका आपण तेवढ्याच ताकदीने साकारू शकतो.”