Dashavatar Marathi Movie Trailer : ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकरांनी आजवर त्यांच्या प्रत्येक कलाकृती प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. केवळ मराठीच नव्हे तर, हिंदी सिनेमामधूनही ते प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आपल्या भूमिकांनी आणि अभिनयाने कायमच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारे दिलीप प्रभावळकर त्यांच्या आगामी सिनेमानिमित्त चांगलेच चर्चेत आहेत आणि त्यांचा हा आगामी सिनेमा म्हणजे ‘दशावतार’.
गेल्या अनेक दिवसांपासून दिलीप प्रभावळकरांच्या ‘दशावतार’ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. सिनेमाचं पहिलं पोस्टर असल्यापासूनच या सिनेमाविषयी अनेकांनी उत्सुकता व्यक्त केली होती. अशातच आता या सिनमाचा ट्रेलर समोर आला आहे. ‘दशावतार’चा हा ट्रेलर खूपच उत्कंठावर्धक आहे.
येत्या महाशिवरात्रीत माझ्या आयुष्यातला शेवटचा दशावतार असल्याचं म्हणतात आणि या ट्रेलरची सुरुवात होते. पुढे ते यात्रेत सोंग घेऊन नाचले तर, त्यांचा नवस पूर्ण होईल असंही म्हणतात. त्यानंतर कोकणातल्या घनदाट जंगलात होणाऱ्या अतिक्रमणाची काही दृश्ये पाहायला मिळत आहे. तसंच भरत जाधव यांच्या भूमिकेच्या तोंडी ‘ये जंगल अपने बाप का है’ असं वाक्यही ऐकायला येत आहे.
ट्रेलरमध्ये पुढे महेश मांजरेकरांची डॅशिंग एन्ट्री पाहायला मिळत आहे. जे कशाचा तरी शोध घेण्यासाठी या गावात आले आहेत. ‘दशावतार’च्या या ट्रेलरमधून सस्पेन्स आणि थ्रिलसह भावनांचा, रूढी परंपरांचा, पारंपरिक लोककलेचा आणि आधुनिक आव्हानांचा खेळही दिसत आहे. शिवाय या सिनेमात प्रेमकहाणीही पाहायला मिळत आहे.
‘दशावतार’मध्ये दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, आरती वडगबाळकर आणि अभिनय बेर्डे अशा अनेक दर्जेदार कलाकारांची मांदियाळी या चित्रपटाच्या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. ‘दशावतार’ चित्रपटाची कथा, पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केले आहे.
चित्रपटाची निर्मिती सुजय हांडे, ओंकार काटे, सुबोध खानोलकर, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे, विनायक जोशी यांनी केली आहे. संवाद आणि गीतलेखन गुरु ठाकूरचं आहे तर संगीत ए.व्ही प्रफुल्लचंद्रने केलं आहे. दरम्यान, येत्या १२ सप्टेंबर रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.