Dilip Prabhavalkar Shares Dashavatar Audience Reaction : १२ सप्टेंबर रोजी आलेल्या ‘दशावतार’ या सिनेमाची मोहिनी प्रेक्षकांवर अजूनही तशीच आहे. चौथ्या आठवड्यातही या सिनेमाची यशस्वी घोडदौड सुरू आहे. अनेक बिग बजेट सिनेमांच्या शर्यतीतही ‘दशावतार’ सिनेमा आपलं स्थान टिकवून आहे. अनेक प्रेक्षक हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊनच बघण्यासाठी आपली पसंती दाखवीत आहेत.
सोशल मीडियासह सर्वच प्रसारमाध्यमांमध्ये सध्या ‘दशावतार’चं कौतुक होत आहे. मराठीमधील अनेक दिग्गज कलाकारांनी या सिनेमाबद्दल आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत कौतुक केलं आहे. ‘कांतारा’च्या दिग्दर्शकानंसुद्धा या सिनेमाबद्दल प्रतिक्रिया देत, येणाऱ्या पिढीसाठी ‘दशावतार’ सिनेमा महत्त्वाचा दस्तऐवज असल्याचं म्हटलं.
‘दशावतार’मध्ये मराठी अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी केलेली बाबुली मेस्त्रीची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली आहे. तसंच सिनेमातून मांडण्यात आलेला विषयसुद्धा अनेकांना भावला आहे. त्याचमुळे हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांत गर्दी करीत आहेत. या प्रेक्षकांबद्दल दिलीप प्रभावळकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसंच त्यांच्या प्रेमामुळे भारावून गेल्याची सुखद भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
‘साम’ला दिलेल्या मुलाखतीत दिलीप प्रभावळकरांना ”दशावतार’बद्दल चाहत्यांचा अत्यंत भावलेला प्रसंग कोणता?’, असा प्रश्न विचारण्यात आला. त्याचं उत्तर देताना दिलीप प्रभावळकर म्हणाले, “असे बरेच प्रसंग आहेत. सिनेमाचं कौतुक करण्यासाठी अनेक प्रेक्षक आणि चाहत्यांनी कॉल वा मेसेजेस केले. हा सिनेमा दाखवण्यासाठी आम्ही आमच्या आजारी आई-वडिलांना, आजी-आजोबांना व्हीलचेअरवर घेऊन गेलो असल्याचंही अनेक प्रेक्षकांनी सांगितलं.”
पुढे दिलीप प्रभावळकर सांगतात, “ज्यांच्या दैनंदिन हालचालीही अगदी मर्यादित आहेत अशा अनेक प्रेक्षकांनी ‘दशावतार’ सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघण्याचा हट्ट धरला आणि त्यांनी थिएटरमध्ये जाऊनच हा सिनेमा पाहिला. त्यामुळे हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघितला पाहिजे, असं असंख्य प्रेक्षकांना वाटणं हा माझ्यासाठी कलाकार म्हणून सुखावणारा आणि आनंद देणारा अनुभव आहे. मला वाटतं हेच या सिनेमाचं आणि आम्हा सगळ्यांचं यश आहे. ‘दशावातार’ सिनेमा करताना आपण जे करीत आहोत, ते चांगलं करीत आहोत हे मला माहीत होतं; पण सिनेमाला इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळेल याची कल्पना नव्हती.”
दरम्यान, सुबोध खानोलकर लिखित व दिग्दर्शित ‘दशावतार’ सिनेमात दिलीप प्रभावळकरांसह महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, आरती वडगबाळकर आणि काही इतर कलाकारही आहेत.
