Dilip Prabhavalkar Share Memory Of Atul Parchure : एखादा सच्चा कलाकार जग सोडून जातो, तेव्हा त्याच्या जाण्यानं एक न भरून येणारी पोकळी निर्माण होते. पण आपल्या कामातून तो कलाकार कायमच प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतो, हे वाक्य दिवंगत अभिनेते अतुल परचुरेंच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू होतं. दिवंगत अतुल परचुरेंच्या निधनानंतर आजही अनेकजण त्यांची आठवण काढताना दिसतात.

अतुल परचुरेंच्या निधनानंतर मराठीसह हिंदी कलाकारसुध्दा हळहळले होते. अनेकांनी त्यांच्याबद्दलच्या भावुक आठवणी सांगितल्या होत्या. त्यांचे अनेक मित्र आजही त्यांची आठवण काढतात. अशातच ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनीसुद्धा अतुल परचुरेंबद्दल आठवण व्यक्त केली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत दिलीप प्रभावळकर अतुल परचुरेंबद्दल व्यक्त झाले आणि यावेळी ते भावुकही झाले.

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत दिलीप प्रभावळकर म्हणाले, “अतुल खूप प्रेमळ होता. आम्ही तीन नाटकांमध्ये एकत्र काम केलं. दोन नाटकात तो माझा मुलगा होता. ‘वासूची सासू’ आणि ‘नाती गोती’ ही ती दोन नाटकं होती. तसंच तिसरं ‘वाह गुरु’ या नाटकात तो माझा विद्यार्थी होता. आम्ही सतत संपर्कात होतो.”

यापुढे ते म्हणतात, “आमचं एकमेकांबरोबर मस्ती मजा करणं कायम चालायचं. आम्ही दोघेही दादरला जवळच राहायचो. नंतर मी पुण्याला गेलो. पण फोन करुन तो मला त्याच्या प्रकृतीच्या अपडेट्स द्यायचा. डॉक्टरांनी क्लिअरन्स दिलाय, सगळं ओके आहे; असं त्याने मला सांगितलं होतं. नंतर तो नाटकाच्या दौऱ्यासाठी अमेरिकेतही जाऊन आला होता. पण नंतर त्याचं आजारपण पुन्हा सुरु झालं.”

यानंतर दिलीप प्रभावळकर म्हणतात, “मला अतुलची खूप आठवण येते. आमच्या अनेक आवडी-निवडीही सारख्याच होत्या. हिंदी संगीताची आवडसुद्धा सारखी होती. लता मंगेशकरांची गाणी आम्ही ऐकायचो. आमचा वात्रटपणाही खूप चालायचा. पण त्याचा वात्रटपणा दिसायचा; माझा दिसत नव्हता.”

दरम्यान, गेल्या वर्षी रोजी अतुल परचुरेंचं निधन झालं. अतुल परचुरेंना कर्करोग झाला होता. पण, अत्यंत जिद्दीने त्यांनी कर्करोगावर मात करून पुन्हा रंगभूमीवर कमबॅक केलं होतं. त्यांच्या या जिद्दीचं खूप कौतुकही झालं होतं. परंतु १४ ऑक्टोबर, २०२४ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.