Rajeshwari Kharat on Marriage with Somnath Awghade:नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटातील शालू व जब्या ही पात्रे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. शालू ही भूमिका अभिनेत्री राजेश्वरी खरात तर जब्या ही भूमिका सोमनाथ अवघडेने साकारली होती.
अनेकदा राजेश्वरी व सोमनाथ हे त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्यांनी डोक्याला मुंडावळ्या बांधल्या होत्या. त्यामुळे त्यांनी लग्न केले आहे, अशा चर्चांना उधाण आले होते. या कलाकारांनी मात्र यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती.
“तो प्रश्न सध्या मी गुपितच…”
आता राजेश्वरी खरातने एका मुलाखतीत यावर वक्तव्य केले आहे. अभिनेत्रीने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी तिला विचारण्यात आले की, राजेश्वरी व सोमनाथचं लग्न झालं आहे का? यावर राजेश्वरी म्हणाली, “मला असं वाटतं की तो प्रश्न सध्या मी गुपितच ठेवते; कारण लग्न झालं आहे की नाही हे लोकांना ठरवू दे. मला थोडा सस्पेन्स ठेवायचा आहे, मी काही दिवसातच आनंदाची बातमी देईन.
पुढे राजेश्वरी म्हणाली, “मी सध्या सोमनाथबरोबर बरेच शूटिंग केले आहेत, लवकरच सर्वांना छान प्रोजेक्ट पाहायला मिळतील. तर माझी व त्याची अपूर्ण राहिलेली गोष्ट होती, ती पूर्ण झालेली या प्रोजेक्टमधून पाहायला मिळणार आहे,” असे म्हणत स्क्रीनवर सोमनाथ व तिचे काही प्रोजेक्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत असा खुलासा केला. पण, खऱ्या आयुष्यात त्यांचे लग्न झाले आहे यावर काही दिवसांनी खुलासा करेन, असे अभिनेत्रीने सांगितले.
याबरोबरच अभिनेत्रीने सोशल मीडियावरील ट्रोलिंग, कमेंट्स यावरदेखील भाष्य केले. धर्मांतराबद्दलदेखील तिने स्पष्ट वक्तव्य केले आहे. याशिवाय, ग्रुपिझममुळे काही मालिकांमधील भूमिका गमवाव्या लागल्या, असेही राजेश्वरी खरातने म्हटले आहे.
दरम्यान, अभिनेत्री सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते. रील्स, डान्स या माध्यमातून ती चाहत्यांच्या भेटीला येते. आता अभिनेत्री कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबरोबरच राजेश्वरी कोणती आनंदाची बातमी देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.