Varsha Usgaonkar receives award at Goa State Film Festival: लोकप्रिय ज्येष्ठ मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपटांत काम केले आहे. त्यांच्या अनेक चित्रपटांची आजही चर्चा होताना दिसते. चित्रपटांसह त्यांनी काही मराठी मालिकांतही काम केले आहे.

नुकताच गोवा राज्य चित्रपट महोत्सव २०२५ पार पडला. या चित्रपट महोत्सवात त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते दिला पुरस्कार

वर्षा उसगांवकर यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत त्यांना पुरस्कार देत असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत वर्षा उसगांवकर यांनी लिहिले की, जीवनगौरव, सन्माननीय गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते देण्यात आला.

वर्षा उसगांवकर यांच्या कामाबद्दल बोलायचे, तर ब्रह्मचारी या नाटकातून अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी गंमत जंमत या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तसेच, १९९३ साली प्रदर्शित झालेल्या इन्सायित की देवता या चित्रपटातून पदार्पण केले.

‘शेजारी शेजारी’, ‘रंग प्रेमाचा’, ‘अफलातून’, ‘सवत माझी लाडकी’, ‘हमाल दे धमाल’, ‘रंग प्रेमाचा’, नवरी मिळे नवऱ्याला, आमच्यासारखे आम्हीच, असे अनेक चित्रपट गाजले. अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे, निळू फुले अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर त्यांनी स्क्रीन शेअर केली. त्यांच्या सहज अभिनयाने त्यांनी त्यांची वेगळी ओळख निर्माण केली.

तर बॉलीवूडमध्ये त्यांनी ‘साथी’, ‘हत्या : द मर्डर’, ‘हनिमून’, ‘घर आया मेरा परदेसी’, ‘हस्ती’, ‘हप्ता बंद’, अशा अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले. मिथुन चक्रवर्ती, ऋषी कपूर, जॅकी श्रॉफ या लोकप्रिय अभिनेत्यांबरोबर त्यांनी काम केले.

तसेच मन उधाण वाऱ्याचे, यज्ञ, सुख म्हणजे नक्की काय असतं अशा लोकप्रिय मालिकांत त्या महत्त्वाच्या भूमिकांत दिसल्या होत्या. तसेच, बिग बॉस मराठीच्या ५ व्या पर्वातदेखील त्या सहभागी झाल्या होत्या.

नुकत्याच त्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अशोक मा.मा.’ या मालिकेत अशोक सराफ यांच्याबरोबर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना दिसल्या.