Hemant Dhome On Hindi Language Controversy : राज्य मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये यापुढे इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवली जाणार आहे. म्हणजेच, पहिलीपासून हिंदीची सक्ती रद्द केली असली तरी पाचवीपर्यंत हिंदी ही ‘तिसरी भाषा’ म्हणून शिकणं बंधनकारक राहणार आहे. हिंदीऐवजी इतर भाषा शिकायची असेल तर २० हून अधिक विद्यार्थी इच्छुक हवेत, अशी माहिती देण्यात आली आहे. या निर्णयावर आता विविध स्तरांतून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
शाळेतील हिंदी भाषा सक्तीवर लोकप्रिय मराठी अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमेने एक्स पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. पडद्यामागून येणाऱ्या या सक्तीचा कडाडून निषेध! असं अभिनेत्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच ही पोस्ट शेअर करताना अभिनेत्याने “महाराष्ट्रात मराठीच” हा हॅशटॅग सुद्धा वापरला आहे.
हेमंत ढोमेची पोस्ट
हिंदी सक्ती मागे घेतली असं वाटणाऱ्या सर्वांसाठी !
कृपया हा जीआर नीट वाचा…
हिंदी ही तृतीय भाषा असेल…
ज्यांना अन्य भाषा शिकायची इच्छा असेल, त्यासाठी किमान २० इच्छुक विद्यार्थी हवेत… (हा काय नियम आहे?)म्हणजे तिसऱ्या आणि त्यातही हिंदी भाषेची सक्ती असेल हे सरकारने ठामपणे सांगितलेले आहे… पहिल्या इयत्तेतल्या मेंदूला किती ताण देणार ? आणि का? मातृभाषा मजबूत करण्यावर जोर का नाही?
एक देश, एक भाषा! असं करायचं ठरवलंच आहे तर…
पडद्यामागून येणाऱ्या या सक्तीचा कडाडून निषेध!
आता तुम्हीच ठरवा, नेमकं काय अभिजात होतंय?महाराष्ट्रात मराठीच…
या पोस्टसह हेमंत ढोमेने ( Hemant Dhome ) जीआरचा फोटो देखील शेअर केला आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील हिंदी सक्तीवर पत्रकार परिषद घेत सरकारला थेट इशारा दिला आहे. गुजरातची एक वेबसाईट आहे त्यावर त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे की गुजराती, गणित आणि इंग्रजी असे तीन विषय पहिलीपासून ठेवले आहेत. मग महाराष्ट्रात सक्ती का? असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.