गश्मीर महाजनी मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. मराठीसह हिंदीतही त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. गश्मीर हा ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मुलगा आहे. गश्मीरने ‘देऊळबंद’, ‘सरसेनापती हंबीरराव’ यांसारख्या दमदार मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. वडील, ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर त्याला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. पण या ट्रोलर्संना देखील गश्मीरनं सडेतोड उत्तर दिलं आणि परखडपणे आपली बाजू मांडताना दिसला.
गश्मीर महाजनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधत असतो. यावेळी चाहते विविध प्रश्नांचा भडीमार करतात. पण चाहत्यांचा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गश्मीर देत असतो. एका चाहत्याने त्याला त्याच्या वयाबाबत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला गश्मीरने उत्तर दिलं आहे.
गश्मीर महाजनीला त्याच्या एका चाहत्याने “तुझं सध्याचं वय किती?” असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देत गश्मीर म्हणाला, “मी माझा जास्तीत जास्त वेळ माझा ४ वर्षाचा मुलगा आणि त्याच्या मित्रांबरोबर घालवतो. त्यामुळे कदाचित ६ किंवा ७ च्या आसपास असावे.”
दरम्यान, गश्मीर महाजनीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो एका नव्या ऐतिहासिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी गश्मीरने ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यामुळे आता गश्मीर कोणती ऐतिहासिक भूमिका साकारणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.