Marathi Actress Kishori Godbole and Daughter Sai Godbole Dance Video : देशभरात शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून पुढचे नऊ दिवस देवीआईची मनोभावे प्रार्थना केल्यावर विजयादशमीला या उत्सवाची सांगता होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत मुंबईत विविध ठिकाणी गरबा तसेच दांडियाच्या शोचं आयोजन करण्यात येतं. बॉलीवूडसह मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी या कार्यक्रमांना उपस्थित असतात. तर, काही कलाकार परंपरा जपत घरगुती पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा करतात.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं. काहींनी नवरात्रीच्या नऊ रंगाप्रमाणे कलर फॉलो करून फोटो शेअर केले होते. तर काही कलाकारांच्या घरी घटस्थापना करून पूजा करण्यात आली आहे. या सगळ्यात मराठी सिनेविश्वातील एका मायलेकीच्या जोडीने शेअर केलेल्या सुंदर डान्स व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
‘फुल ३ धमाल’, ‘खबरदार’, ‘वन रुम किचन’, ‘माझा नवरा तुझी बायको’ अशा विविध सिनेमांमधून घराघरांत पोहोचलेल्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणून किशोरी गोडबोले यांना ओळखलं जातं. ‘अधूरी एक कहाणी’ या मालिकेमुळे त्यांना विशेष पसंती मिळाली होती. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी किशोरी यांनी आपल्या लेकीसह डान्स करतानाचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
किशोरी गोडबोले यांची लेक सईने २०२१ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अभिनय आणि गाण्याबरोबरच ती उत्तम नृत्यदेखील करते. सध्या किशोरी आणि सईचा सुंदर डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटातील ‘ढोलिडा’ या गाण्यावर या दोघी मायलेकी जबरदस्त डान्स करत गरबा खेळल्या आहेत. हा व्हिडीओ सईने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला असून या व्हिडीओला अवघ्या काही तासात ५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
किशोरी आणि सई गोडबोले या मायलेकींच्या व्हिडीओवर मराठी कलाकारांसह नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “केवळ कमाल”, “खूप छान दोघींना भारी डान्स केला”, “आई अन् मुलीची जोडी Best Duo”, “मायलेकीची जबरदस्त जोडी दोघी सारख्याच दिसतात”, “सई तुझं कौतुक आहेच पण तुझ्या आईची कमाल एनर्जी लक्ष वेधून घेते…जबरदस्त परफॉर्मन्स” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या डान्स व्हिडीओवर केल्या आहेत.