नाटक, टीव्ही मालिका, रिअ‍ॅलिटी शो, तसंच मराठी आणि हिंदी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे किशोरी शहाणे. वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी पहिला चित्रपट करणाऱ्या अभिनेत्रीने केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही नावलौकिक मिळविला. किशोरी यांनी आजवर त्यांच्या अभिनयाने व नृत्यशैलीने सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

मिठीबाई कॉलेजमध्ये शिकत असताना किशोरी शहाणे यांनी ‘मिस मिठीबाई’ हा खिताब मिळवला. विशेष म्हणजे अकरावीत असताना ‘प्रेम करुया खुल्लम खुल्ला’ हा त्यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि पदवीपर्यंतचं शिक्षण घेईपर्यंत किशोरी यांनी २० हून अधिक चित्रपटात काम केले होते. यामुळे त्याकाळी त्यांची प्रसिद्धी आणि लोकप्रियता ही अफाट होती.

चित्रपटांमधून काम केल्यानंतर अचानक प्रसिद्धी झोतात आलेल्या किशोरी यांनी परीक्षेसाठी चक्क बुरखा घातला होता. याबद्दल स्वत: किशोरी यांनीच लोकशाही मराठी फ्रेंडलीबरोबर साधलेल्या संवादात खास किस्सा सांगितला. किशोरी यांना तेव्हाच्या लोकप्रियतेबद्दल विचारण्यात आले असता, त्या म्हणाल्या, “मला परीक्षेसाठी ही समस्या झाली होती. बारावीच्या बोर्ड परीक्षेचे केंद्र कॉलेजमध्ये नसल्याने दुसऱ्या कॉलेजमध्ये जावं लागत असे.”

यापुढे त्या म्हणाल्या, “माझ्या कॉलेजमधील लोक मला ओळखत होते. त्यांच्यासाठी मी त्यांची विद्यार्थीनी होते. किंवा ती फिल्ममध्येही काम करते असं एक होतं. पण जेव्हा मी परीक्षेसाठी केंद्रावर जायचे; तेव्हा तिथे थोडा प्रॉब्लेम व्हायला लागला. कारण तेव्हा समवयीन मुलं सतत बघायचे. ही तर हिरोईन आहे आणि ही परीक्षा देत आहे वगैरे वगैरे… सुरुवातीला एक-दोन दिवस बघितलं. पण परीक्षा देताना तुम्हाला लक्ष द्यावं लागतं.”

पुढे त्यांनी सांगितलं की, “परीक्षा देताना मी एकटी आहे. बाकी माझ्याकडे कोण किती बघत आहे. आणि त्याचा माझ्या मार्क्सवर परिणाम झाला तर गोंधळ होईल. मग मी बुरखा घेतला. माझ्या डिझाईनरला सांगितलं की, मला एक बुरखा करून दे आणि त्याने एका रात्रीत बुरखा बनवून दिला. मग मी तो बुरखा घालून परीक्षा द्यायला जायला लागले. तसं मी बारावी आणि त्यानंतर बाकीचे सगळे पेपर दिले.”