अभिनेता जितेंद्र जोशी व अभिनेत्री उर्मिला कोठारे यांची प्रमुख भूमिका असलेला ‘काकण’ चित्रपट २०१५ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री क्रांती रेडकरने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं. सुधामती व किसूची प्रेमकहाणी या चित्रपटात पाहायला मिळते. या चित्रपटाचं शीर्षकगीत अजूनही आवडीने पाहिलं जातं. सोशल मीडियावर तर याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अशा या ‘काकण’ चित्रपटाची कथा ऐकून क्रांती रेडकरच्या जुळ्या मुली रडू लागल्या आणि त्या अभिनेत्रीला बरंच काही म्हणाल्या. हा किस्सा नुकताच क्रांतीने व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. मजेशीर व्हिडीओ व्यतिरिक्त आपली परखड मत व्यक्त करत असते. तिच्या जुळ्या मुलीचे व्हिडीओ हे नेहमी चर्चेत असतात. नुकताच क्रांतीने मुलींचा मजेशीर किस्सा सांगितला आहे.

हेही वाचा – Video: डॅडींनी तुळजाचं लग्न लावलं सूर्याशी अन्…, ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत आला मोठा ट्विस्ट, पाहा प्रोमो

या व्हिडीओत क्रांती म्हणतेय, “बरं छबिल, गोदू माझ्यावर चिडल्या आहेत माहितीये ना. तर ते ‘आकाशी चंद्र चांदण्या’ गाणं इन्स्टाग्रामवर सतत लागायचं. त्यामुळे एकेदिवशी माझ्या घरच्यांनी त्यांना सांगितलं की, तुम्हाला माहितीये का? ‘आकाशी चंद्र चांदण्या’ हे गाणं तुझ्या मम्मीच्या चित्रपटातलं आहे. तुझ्या मम्मीने ते बनवलं आहे. तर त्यांना काही माहिती नव्हतं, मी लेखिका आहे, दिग्दर्शिका आहे किंवा मी चित्रपट बनवते. मग त्यांनी चित्रपटाची कथा काय आहे? असं विचारलं. तर मी त्यांना इंग्रजीत समजेल असं सांगितलं आणि म्हटलं शेवटी किसूचा मृत्यू होतो. तर त्या म्हणतात, त्याचा कसा काय मृत्यू होतो? मी सांगितलं, अगं तो शेवटी म्हातारा होतो आणि मरतो. तर त्या म्हणतात, नाही मम्मा नाही. तो मरू शकत नाही. आम्ही चित्रपट बघू का? त्यामुळे मी दोघींना युट्यूबवर चित्रपटाचा थोडासा शेवट दाखवला.”

“त्यानंतर दोघी रडत म्हणाल्या, मम्मा हे चुकीचं आहे. तू त्याला जिवंत कर. मी बेबी म्हणून ओरडले. तर म्हणतात, नाही मम्मा तू चुकीचा चित्रपट बनवला आहेस. तू आताच्या आता बदल. असं करून त्या भोकाड पसरून रडत होत्या. त्यांना खूपच दुःख झालं. त्यांना वाटतं, मी चित्रपटाचा शेवट बदलला पाहिजे. त्याला जिवंत केलं पाहिजे आणि सुधामती-किसूला एकत्र आणलं पाहिजे. आता याचं काय करालं?” असं क्रांती विचारतेय.

हेही वाचा – “माझं संपूर्ण जगणं…”, अविनाश नारकरांनी सासऱ्यांसाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाले…

दरम्यान, क्रांती रेडकरचा हा व्हिडीओ पाहून काही कलाकार मंडळींसह चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “छबिल आणि गोदू ऑल व्हेज रॉक अँड ऑल व्हेज शॉर्क्ड”, “मॉम काहीही करू शकते. पुन्हा क्लायमॅक्समध्ये बदल होऊ शकतो”, “खरंच माझी पण आठ वर्षांची मुलगी हा चित्रपट पाहून रडली”, अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kranti redkar twin daughters started crying after watching the movie kakan pps