Lalit Prabhakar and Hruta Durgule on definitions of love: सप्टेंबर महिन्यात अनेक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘बिन लग्नाची गोष्ट’, ‘दशावतार’, ‘साबर बोंड’ आणि ‘आरपार’ असे विविध कथा असलेले चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटांच्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटांबाबत उत्सुकता असल्याचे पाहायला मिळते.

अभिनेता ललित प्रभाकर व अभिनेत्री हृता दुर्गुळे हे कलाकार ‘आरपार’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर, गाण्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ही एक लव्हस्टोरी असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी या चित्रपटात अमर-प्राची या भूमिका साकारल्या आहेत. आता प्रमोशनच्या निमित्ताने हे कलाकार विविध मुलाखती देत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या कलाकारांनी प्रेमाची परिभाषा सांगितली आहे.

“जे सांगता येत नाही…”

हृता दुर्गुळे व ललित प्रभाकर यांनी नुकतीच नवशक्तीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना, त्यांच्या प्रेम म्हणजे तुमच्यासाठी काय आहे? त्यावर ललित प्रभाकर म्हणाला, “मला वाटतं की जे सांगता येत नाही, स्पष्ट करता येत नाही, ते प्रेम असतं. कारण- कुठलीही गोष्ट स्पष्टीकरण देऊन सांगितली, सविस्तरपणे सांगितली की त्याला बंधनं येतात. ते जर सीमारेषेच्या आतील असेल तर ते अधलं-मधलं होतं. प्रेमात अधलं-मधलं काही नसतं, असं मला वाटतं.”

“माझ्या आयुष्यात खूप…”

हृता म्हणाली, “मला माझ्या आयुष्यात कसं प्रेम हवं आहे, मला खूप याबद्दल स्पष्टता होती किंवा आहे. माझ्या आयुष्यात खूप ठराविक माणसं आहेत. माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि त्यांचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची भाषा खूप वेगळी आहे. त्याची व्याख्या सांगता येणार नाही. पण, एक व्यक्ती आयुष्यभर तुम्हाला बरोबर हवी असते.

“तुम्हाला सतत कोणीतरी हवं असतं, जी तुमच्या आयुष्यातील आठवणी साठवुण ठेवते. त्याचं ती आयुष्यभर डॉक्युमेंटेशन करते. त्यामुळे तुम्हाला गोष्टींकडे बघण्याचा दुसरा दृष्टीकोण मिळतो. त्यामुळे माझ्या डोक्यात स्पष्ट होतं की मला कसा जोडीदार हवा आहे किंवा मला आयुष्यभरासाठी कसं प्रेम हवं आहे.”

“मला अशी व्यक्ती हवी होती की जी अजिबात जज करत नाही. जो सतत तू हे का करतेस, असा प्रश्न विचारणार नाही. मला तसंच कोणीतरी हवं होतं. तर ते मला प्रतीकच्या रुपात मिळालेलं आहे. मला कायम असं वाटतं की तुम्ही जेव्हा प्रेमात पडता किंवा तुम्ही कोणाबरोबर तरी असाल तर तेव्हा तुमचं आयुष्य बदललं पाहिजे. तुम्ही एकमेकांच्या आयुष्यात काही व्हॅल्यु अॅडिशन केली पाहिजे.”

“मला अशीच व्यक्ती हवी होती की जी जज करणार नाही आणि ती मला पुढे जाण्यास मदत करेल. मला पाठिंबा देईल. माझा पती, प्रतीकने मला खरंच पंख दिले आहेत. त्याचं म्हणणं असं असतं की तू तुला पाहिजे ते काम कर, मी आहे. सेफ्टी नेट काय असतं, ते मी प्रतीकमुळे अनुभवलं आहे. “

दरम्यान, ‘आरपार’ हा सिनेमा १२ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. हृता व ललित यांना पडद्यावर एकत्र पाहण्यास प्रेक्षक उत्सुक होते, आता प्रेक्षकांना त्यांची जोडी आवडणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.