आता बऱ्याच कलाकार मंडळींनी शहरापासून दूर निर्सगाच्या सानिध्यात स्वतःचं फार्महाऊस बांधलं आहे. मृण्मयी देशपांडे, प्राजक्ता माळी, प्रथमेश शिवलकर, अवधूत गुप्ते अशा बऱ्याच कलाकारांचं स्वतःचं फार्महाऊस आहे. अशाच मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडप्यानं १२ ते १५ वर्ष कष्ट करून फार्महाऊस बांधलं आहे. ज्याची झलक नुकतीच पाहायला मिळाली.

लोकप्रिय दिग्दर्शक परेश मोकाशी आणि अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी यांनी स्वतःचं वाडा येथे फार्महाऊस बांधलं आहे. ३ एकरांवर हे फार्महाऊस पसरलं आहे. आता या फार्महाऊसच्या आजूबाजूला वन उभं केलं जातं आहे. याचा व्हिडीओ मधुगंधा कुलकर्णीनं शेअर करून या फार्महाऊसची गोष्ट सांगितली आहे.

व्हिडीओमध्ये मधुगंधा सांगतेय की, मी आणि परेश आम्ही दोघेही शेतकरी. आमच्या फार्महाऊसचं नावं ‘हिरण्य’ आहे. हिरण्य म्हणजे सोनं! आमच्यासाठी हे फार्महाऊस सोन्या इतकंच अमुल्य आहे. कारण हे मिळवण्यासाठी आम्हाला १२ ते १५ वर्ष कष्ट करावी लागली आहेत. एक वैराण जमीन विकत घेतली. त्याच्यावर घर बांधलं आणि त्याच्या आजूबाजूला वन उभं करू या, असं आम्ही स्वप्न बघितलं. त्यामुळे दरवर्षी आम्ही थोडी थोडी झाडं लावून आम्ही आमचं स्वप्न पूर्ण करत आहोत. फार्महाऊसचा आनंद काय आहे माहिती आहे का, इथे आपण जागे होतो पक्ष्यांच्या किलबिलांटांनी. हे सुख शहरात मिळत नाही.

पुढे मधुगंधा कुलकर्णी म्हणाली की, आज सकाळी मी उठले, तर इकडंची पोरं धावत आली. त्यांच्याबरोबर थोडीशी खेळले, मस्ती केली. थोडं झाडांना पाणी घातलं. पण आज माझं दुसरं टार्गेट आहे, ते म्हणजे विहीर स्वच्छ करणं. मी स्वतः विहिरीत उतरले. म्हटलं, बघू तरी किती कष्ट विहीर स्वच्छ करायला पडतात. हेच इकडंचं जीम आहे बरं का. थोडी विहीर मी स्वच्छ केली. थोडी आमच्या नारायण भाऊंनी केली आणि आज घरामध्ये स्वच्छ केलेल्या विहिरतलं पाणी येणार आहे. त्याच्यानंतर सुरू होतं, पावसाळ्यापूर्वीचं प्लॅनिंग…कुठली झाडं लावायची आहेत, किती खड्डे करायचे आहेत, रोपं कुठून आणायची, वन करायचं म्हणजे हे सगळं प्लॅनिंग करावंच लागणार ना. बाकी सगळं पुढच्या व्हिडीओमध्ये.

फार्महाऊसचा व्हिडीओ शेअर करत मधुगंधा कुलकर्णीने कॅप्शनमध्ये लिहिलं, “फ… फ… फार्मचा…जन्माने शेतकरी, वृत्तीने वारकरी आणि कर्माने फिल्मकरी…माझा विठ्ठल माझा निसर्ग आहे. त्याच्या जवळ जाण्याचा थोडा प्रयत्न. शेती, झाडं , जमिनीवरचं घर सत्यात उतरतं तो अनुभव घेणं आणि तो जगणं…हे माझ्या या सीरिज मधून मी शेअर करतेय…आशा आहे तुम्हा सगळ्यांना आवडेल…तुमचा अभिप्राय नक्की कळवा…निसर्गाचा विजय असो.”

दरम्यान, परेश मोकाशी व मधुगंधा कुलकर्णीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ‘नाच गं घुमा’नंतर त्यांचा ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. वर्षांच्या सुरुवातीला १ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी परेश मोकाशी यांनी सांभाळली होती. तर मधुगंधा चित्रपटाची निर्माती होती. ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ चित्रपटात प्रशांत दामले आनंद इंगळे, मनमीत पेम, प्रणव रावराणे, वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी, अद्वैत दादरकर, गणेश मयेकर, रितिका श्रोती, दिप्ती लेले असे तगडे कलाकार मंडळी झळकले होते.